
अमरावती शहर:शाळेतून चोरी गेलेला ७० हजारांचा टीव्ही अवघ्या ५ तासांत जप्त; बडनेरा पोलिसांची धडक कारवाई

अमरावती: बडनेरा पोलिसांची धडक कारवाई; शाळेतून चोरी गेलेला ७० हजारांचा डिजिटल LED टीव्ही व साहित्य अवघ्या पाच तासात हस्तगत, गुन्हा उघड!
अमरावती (प्रतिनिधी): अमरावती शहरातील बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठी कारवाई समोर आली आहे. मनपा शाळेतून चोरीला गेलेला तब्बल ७० हजार रुपयांचा डिजिटल LED टीव्ही आणि इतर साहित्य अवघ्या पाच तासांच्या आत जप्त करण्यात बडनेरा पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी अत्यंत वेगाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे.
अमरावती शहरातील मनपा शाळा क्रमांक २४ (पवन नगर, नवीन वस्ती, बडनेरा) मधील चौथीच्या वर्ग खोलीतून अज्ञात चोराने शाळेतील महत्त्वाचे साहित्य लांबवले होते. यामध्ये ६८ इंच लांबीचा Truview कंपनीचा डिजिटल LED टीव्ही, एक UPS आणि एक स्पीकर अशा एकूण ७०,००० रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश होता. ही घटना दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १८:०० वाजता ते १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या दरम्यान घडली.


मुख्याध्यापकांची पोलिसांत तक्रार
घटनेची माहिती मिळताच शाळेचे मुख्याध्यापक गौरव विश्वासराव मेश्राम (वय ३९ वर्षे, रा. गजानन धाम रेवसा रोड, अमरावती) यांनी तात्काळ बडनेरा पोलीस ठाण्यात येऊन रीतसर तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १५:२९ वाजता भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(इ), ३३१(३), ३३१(४) नुसार गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने हालवली.

पाच तासांत लावला छडा; दोन विधीसंघर्षग्रस्त बालक निष्पन्न
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासादरम्यान खबऱ्यांचे जाळे पसरले. यादरम्यान गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, हा चोरीचा माल इंदिरा नगर, नवीन वस्ती, बडनेरा येथील एका व्यक्तीने चोरला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवली असता, हा चोरीचा प्रकार दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांनी संगनमताने केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून ६८ इंच लांबीचा डिजिटल LED टीव्ही आणि एक स्पीकर असा संपूर्ण ७०,००० रुपयांचा मुद्देमाल यशस्वीरित्या जप्त केला.
पोलिसांचे उल्लेखनीय यश
सदरची धडक आणि प्रशंसनीय कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त (झोन नं. १) यशवंत सोळंके, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (फ्रेजरपुरा) श्रीमती नयन अलुरकर यांच्या मार्गदर्शनखाली पार पडली.

यात बडनेरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट, डी. बी. पथकाचे पोनि. प्रमोद इंगळे यांच्यासह पोलीस कर्मचारी पोहेकॉ/९३३ सुधीर प्रांजळे, पोहेकॉ/२६ निलेश गुल्हाने, पोकॉ/१६१० वचन पंडित, पोकॉ/१५३० प्रमोद सायरे, पोकॉ/१५५५ रितेश चौहान आणि पोकॉ/१७७६ मोहम्मद समीर यांनी सहभाग घेऊन अवघ्या काही तासांत प्रकरणाचा यशस्वी निकाल लावला.




