
हिंगणघाटात कापूस चोरीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून मुख्य आरोपीसह ३ बालके जेरबंद, ३.१४ लाखांचा मुद्देमाल जप्त!

हिंगणघाटात शेतातील कापूस चोरीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, मुख्य आरोपीसह ३ बालके ताब्यात
वर्धा :
वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट परिसरात शेतातील वेचणी करून ठेवलेल्या कापसाची चोरी करणाऱ्या एका मुख्य आरोपीसह तीन विधिसंघर्षित बालकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. पोलिसांनी या धडक कारवाईत ३ लाख १४ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या कारवाईमुळे परिसरातील घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश झाला आहे.

घटनेची पार्श्वभूमी:
फिर्यादी प्रवीण माणिकराव शिंदे (रा. संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट) यांनी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी हिंगणघाट पोलीस ठाण्यात येऊन तोंडी फिर्याद दिली होती. त्यांच्या मौजा सेलू (मुरपाड) धामणगाव शेतशिवारातील बंड्यात वेचणी करून ठेवलेला कापूस अज्ञात चोरट्यांनी बंड्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून लांबवला होता. या तक्रारीवरून हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

समांतर तपास आणि धडक कारवाई:
गुन्ह्याची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत असताना, गोपनिय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. तपासात खालील आरोपी निष्पन्न झाले:

-
अथांग कवडुजी कांबळे (वय १९ वर्षे, रा. संत तुकडोजी वॉर्ड, हिंगणघाट)
-
तीन विधिसंघर्षित बालक

पोलीस पथकाने हिंगणघाट परिसरात शोध घेऊन मुख्य आरोपी व विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. सखोल विचारपूस केली असता, त्यांनी संगनमताने २९ ऑक्टोबर २०२६ रोजी शेतातील बंड्याचे कुलूप तोडून कापूस चोरल्याची व चोरीचा माल जे.आर. टेक्सटाइल, नांदगाव येथे विकल्याची कबुली दिली. हा कापूस विधी संघर्षित बालकाच्या मामाच्या टाटा एस पिकअप वाहनातून नेण्यात आला होता.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
पंचनाम्यादरम्यान पोलिसांनी खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला आहे:

-
१६२ किलो कापूस: किंमत १४,५८० रुपये
-
टाटा कंपनीचे पिकअप वाहन (क्र. MH 46 AF 2164): किंमत ३,००,००० रुपये
-
एकूण जप्त मुद्देमाल: ३,१४,५८० रुपये
आरोपी, विधिसंघर्षित बाळके आणि जप्त करण्यात आलेला संपूर्ण मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन हिंगणघाट यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
मार्गदर्शन व यशस्वी कामगिरी:
सदरची यशस्वी कारवाई वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस अंमलदारांच्या पथकाने अत्यंत वेगाने व यशस्वीरीत्या पार पाडली:
-
मनोज धात्रक (स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा)
-
महादेव सानप (स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा)
-
अनुप राऊत (स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा)
-
हर्षल सोनटक्के (स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा)
-
अभिषेक नाईक (स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा)
-
आशिष मेश्राम (स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा)
-
मीना कौरती (सायबर सेल, वर्धा)



