
धाड पेट्रोल पंप चोरी प्रकरण: १.०५ लाखांच्या मुद्देमालासह आरोपीला अटक
धाड येथील भोंडे पेट्रोल पंपावरील चोरीचा उलगडा; आरोपी गजाआड, १,०५,००० रुपये १००% जप्त
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील भोंडे पेट्रोल पंपावर झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या काही दिवसांत यशस्वी उकल केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून चोरीला गेलेली १,०५,००० रुपयांची संपूर्ण नगदी रक्कम (१००% रिकव्हरी) हस्तगत केली आहे. म्हसला बु. (ता. जि. बुलढाणा) येथील रहिवासी फिर्यादी श्री. खंडु संतोषराव भोडे (वय ३७ वर्षे) यांनी धाड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तक्रारीनुसार, १५ जुलै २०२६ ते १६ जुलै २०२६ च्या रात्रीदरम्यान अज्ञात चोरट्याने करडी फाट्यावरील त्यांच्या भोंडे पेट्रोल पंपावरून १,०५,००० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस कारवाई आणि आरोपीस अटक
जिल्ह्यातील घरफोडी व चोरीच्या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत पोलीस अधीक्षक मा. श्री. निलेश तांबे यांनी गुन्ह्यांचा सखोल तपास करून आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.

त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. आशीष रोही यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. पथकाने अत्यंत शिताफीने गुप्त माहितीच्या आधारे मौंढाळा (ता. जि. बुलढाणा) येथून संशयित आरोपीला ताब्यात घेतले.
-
अटक आरोपीचे नाव: स्वप्नील नुदाराम वाघमारे (वय १९ वर्षे, रा. मौंढाळा, ता. जि. बुलढाणा).

-
जप्त मुद्देमाल: चोरीस गेलेली १,०५,००० रुपयांची पूर्ण नगदी रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
-
पुढील तपास: या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास धाड पोलीस ठाणे करत आहे.

कामगिरी करणारे पथक
ही धडक कामगिरी बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड (बुलढाणा) व अपर पोलीस अधीक्षक पीयुष जगताप (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
-
नेतृत्व: पोनि. आशीष रोही (स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा).

-
तपास पथक: पी.एस.आय. प्रताप बाजड, पोहेकॉ. शरद गीरी, जगदेव टेकाळे, पुरुषोत्तम अघाव आणि युवराज राठोड.




