
महामार्गावरील हॉटेल आडून चालणाऱ्या ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश; १० किलोहून अधिक ‘डोडा’ जप्त

“डोडा अंमली पदार्थाची विक्री करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही.”
वर्धा

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ लगत असलेल्या एका हॉटेलच्या आडून सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या अवैध विक्रीचा वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आलेल्या या धडक कारवाईत पोलिसांनी १० किलो ४०० ग्रॅम ‘डोडा’ (अफूच्या बोंडाचा चुरा/पॉपी स्ट्रॉ) आणि मोबाईल असा एकूण २ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय?

वर्धा जिल्ह्यात अमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक विशेष मोहीम राबवत असताना, समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ लगत असलेल्या मौजा आजदा शिवारातील ‘मुबारीक हरियाणा मेवात हॉटेल’ येथे बेकायदेशीररीत्या अमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती खबऱ्यामार्फत पथकाला मिळाली.
सापळा रचून धाड आणि जप्ती

मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १५ नोव्हेंबर रोजी या हॉटेलवर एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यान्वये छापा टाकला. यावेळी हॉटेलमध्ये सुरेश शिवराज डारा (वय २७ वर्षे, रा. डारा की ढाणी, दुगोली, जि. नागौर, राजस्थान) हा आढळून आला.
पोलिसांनी हॉटेलची आणि आरोपीची झडती घेतली असता तिथे १० किलो ४०० ग्रॅम वजनाचा ‘डोडा’ (अफूच्या बोंडाचा चुरा) आणि एक अँड्रॉइड मोबाईल असा एकूण २,१८,००० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

दोन राज्यांतील तस्करांचे कनेक्शन उघड
प्राथमिक चौकशीत हा अमली पदार्थांचा साठा अटक करण्यात आलेला आरोपी सुरेश डारा आणि हॉटेलचा मालक मुबारीक खान (मूळ रा. रूपडाका, जि. पलवल, हरियाणा; सध्या रा. मुबारीक हरियाणा मेवात हॉटेल, आजदा, ता. समुद्रपूर) या दोघांच्या मालकीचा असल्याचे समोर आले आहे. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना व ग्राहकांना हॉटेलमधून हा अमली पदार्थ विकला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी जागीच जप्ती पंचनामा करून दोन्ही आरोपींविरुद्ध समुद्रपूर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे.
कारवाई करणारे पथक
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सपोनि आशिषसिंग ठाकूर, पोउपनि सिनुकुमार बानोत, तसेच पोलीस अंमलदार अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, सागर भोसले आणि रवी पुरोहित यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.



