
नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; उमरेडमधील दोन गुंडांच्या टोळीवर ‘मोक्का’ (MCOCA) लागू
नागपूर: नागपूर ग्रामीण पोलिसांनी परिसरात स्वतःचे वर्चस्व निर्माण करून दहशत पसरवणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ (MCOCA – मोक्का) अंतर्गत कडक कारवाई केली आहे. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार आणि अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली उमरेड पोलिसांनी ही कारवाई केली.
टोळीतील आरोपींची नावे: १) जानी उर्फ सोहेब सईद शेख (वय २३ वर्षे, रा. कावरापेठ, उमरेड, जि. नागपूर) – टोळी प्रमुख

२) पप्पू उर्फ प्रफुल ज्ञानेश्वर गायधने (वय २५ वर्षे, रा. कावरापेठ, उमरेड, जि. नागपूर) – टोळी सदस्य
खुनाची घटना आणि गुन्ह्याची पार्श्वभूमी: २४ मे २०२६ रोजी रात्री १०:०० ते ११:०० वाजताच्या सुमारास उमरेड येथील कावरापेठ भागात गोलू शेख यांच्या हबीबी पानठेल्यासमोर एक थरारक घटना घडली होती. या ठिकाणी टोळी प्रमुख सोहेल उर्फ जानी शाहीद शेख उभा असताना, मृत राजकुमार पवार यांनी त्याला “क्या रे जानी” असे म्हणून त्याच्या मानेवर हात मारला. या किरकोळ कारणावरून आरोपीला प्रचंड राग आला.

राग अनावर झाल्याने आरोपीने मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील रहिवासी असलेले आणि सध्या कावरापेठ, उमरेड येथे राहणारे राजकुमार मारोती पवार (वय ५० वर्षे) यांच्यावर चाकूने सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले व त्यांचा खून केला. याप्रकरणी उमरेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ६१२/२०२६ अन्वये भा.न्या.सं. कलम १०३(१), ६१(२), २३८(ब) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलीस तपासात या खुनाच्या गुन्ह्यात पप्पू उर्फ प्रफुल ज्ञानेश्वर गायधने याचाही प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते.

सततच्या गुन्हेगारीमुळे लागला ‘मोक्का’: पोलीस तपासादरम्यान समोर आले की, ही टोळी संघटितपणे गुन्हेगारी कृत्ये करत होती. टोळी प्रमुख जानी उर्फ सोहेब सईद शेख हा स्वतः किंवा टोळीतील सदस्यांच्या मदतीने परिसरात आपली दहशत आणि वर्चस्व राखण्यासाठी खून, प्राणघातक हल्ला करून गंभीर दुखापत करणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे करत आला आहे.
या टोळीविरुद्ध उमरेड पोलीस ठाण्यात यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाया केल्या, मात्र त्यांच्या गुन्हेगारी कारवाया थांबल्या नाहीत. अखेर उमरेड पोलिसांनी या टोळीविरुद्ध ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परीक्षेत्र यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आता या गुन्ह्यात मोक्का कायद्याची कलमे वाढवण्यात आली आहेत.






