
साकोली पोलिसांची मोठी कारवाई! साडेआठ लाखांच्या मुद्देमालासह अवैध सुगंधी तंबाखू जप्त
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूच्या छुप्या वाहतुकीविरोधात भंडारा पोलिसांची धडक कारवाई सुरूच आहे. साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून पोलिसांनी अवैध सुगंधी तंबाखूची वाहतूक करणारी एक मारुती इको (EECO) कार पकडली आहे. या कारवाईत पोलिसांनी ८ लाख ५६,४८० रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक केली आहे.
गोपनीय बातमीदाराच्या खबरेवरून पडली धाड
मिळालेल्या माहितीनुसार, ११ जून २०२६ रोजी साकोली पोलिसांना एका गोपनीय बातमीदाराकडून (मुखबिर) खात्रीशीर माहिती मिळाली होती की, राष्ट्रीय महामार्गावरून प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे साकोली पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील मौजा सेंदूरवाफा बोगद्याजवळ तातडीने नाकेबंदी करून रेड केली.

या नाकेबंदी दरम्यान पोलिसांना ग्रे रंगाची सुझुकी कंपनीची इको (EECO) चारचाकी गाडी (क्रमांक: MH 35 AR 7965) संशयास्पद स्थितीत आढळली. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता, त्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखूचा मोठा साठा आढळून आला.
१८७ किलो तंबाखू जप्त; आरोपीच्या घरावरही धाड
गाडी चालवणाऱ्या पहिल्या आरोपीने चौकशीत सांगितले की, हा माल तो साकोली येथील दुसऱ्या आरोपीला देण्यासाठी जात होता. या माहितीवरून पोलिसांनी तातडीने दुसऱ्या आरोपीच्या घरावर पंचांसमक्ष छापा टाकून घरझडती घेतली.

कारवाईत जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
-
सुगंधी तंबाखू: एकूण वजन १८७ किलो ७४ ग्रॅम (किंमत: ३,५६,४८० रुपये)

-
चारचाकी वाहन (EECO): अंदाजे किंमत ५,००,००० रुपये
-
एकूण जप्त मुद्देमाल: ८,५६,४८० रुपये

-
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे: १. श्री. मोहित मदन कापसे (वय २५ वर्षे), रा. वॉर्ड नं. ०१, देवरी, ता. देवरी, जि. गोंदिया. २. तरुण राजकुमार मल्लानी (वय ३८ वर्षे), रा. सिव्हिल वॉर्ड, वॉर्ड नं. ८, साकोली, जि. भंडारा.
विविध कडक कलमांखाली गुन्हा दाखल
याप्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात अप.क्र. ४९१/२०२६ नुसार अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६, अन्न सुरक्षा नियम व विनियमन २०११ च्या विविध कलमांसह भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १२३, २७४, २७५ आणि २२३ अन्वये गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात झाली कारवाई
ही धडक कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे, साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शिवम विसापुरे आणि पोलीस निरीक्षक श्री. आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. साकोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. वडुले आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली असून, प्रकरणाचा पुढील तपास साकोली पोलीस अधिकारी करत आहेत




