
वर्ध्यात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: अवैध वाळू वाहतूक करणारी तीन वाहने जप्त, १.३१ कोटींचा मुद्देमाल हस्तगत
वर्धा: वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवैध वाळू उपसा आणि चोरट्या वाहतुकीविरोधात एक मोठी कारवाई केली आहे. येळाकेळी टोलनाक्याजवळ सार्वजनिक रस्त्यावरून चोरीची वाळू वाहून नेणारे सोळा व अठरा चाकी तीन मोठे ट्रक पोलिसांनी जप्त केले असून, वाहन चालक आणि मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत एकूण १ कोटी ३१ लाख ९० हजार ६५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर धडक कारवाई वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सिनुकुमार बानोत, पोलीस हवालदार नरेंद्र पाराशर, तसेच पोलीस कॉन्स्टेबल मिथुन जिचकार, दीपक साठे आणि प्रफुल पुनवटकर यांच्या पथकाने केली आहे.
रात्रीच्या नाकाबंदीत वाहने गळाला स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, येळाकेळी टोलनाक्यावरून काही ट्रक वाळूची चोरटी वाहतूक करत आहेत. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने दिनांक ६ जुलै ते ७ जुलै २०२६ च्या दरम्यान रात्रीच्या वेळी या परिसरात नाकाबंदी केली. ७ जुलैच्या रात्री पोलिसांनी संशयास्पद वाटणारे एक हायवा टिप्पर, एक ट्रेलर आणि एक एलपी वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये अवैधरित्या चोरीची वाळू भरलेली असल्याचे आढळून आले.

सुमारे ४० ब्रास वाळू जप्त पोलिसांनी तिन्ही वाहने जप्त करून पोलीस मुख्यालय, वर्धा येथे आणली. त्यानंतर वर्धा तहसीलदारांकडून या वाहनांमधील वाळूची मोजणी करून घेण्यात आली. तपासात खालीलप्रमाणे वाळूचा साठा आढळून आला:
-
हायवा टिप्पर (MH 40 CT 9991): १३.१६ ब्रास वाळू

-
एलपी वाहन (MH 40 CT 0022): १३.३४ ब्रास वाळू
-
ट्रेलर (MH 27 DT 2060): १३.२२ ब्रास वाळू

चालकांकडे वाळूबाबत विचारपूस केली असता, दोन चालकांनी ही वाळू जुनगांव (ता. पोंभुर्णा, जि. चंद्रपूर) येथून आणि एका चालकाने वैरागड (ता. आरमोरी, जि. गडचिरोली) येथून आणल्याची कबुली दिली.
चालक आणि मालकांवर गुन्हे दाखल या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालक आणि मालकांविरुद्ध सावंगी मेघे पोलीस ठाण्यात गुन्हा (अ.क्र. ५५४/२६) दाखल केला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८(८) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आरोपींची नावे: १) वाहन क्र. MH 40 CT 9991: चालक फैजान खान वसिम खान (वय २३, रा. अमरावती) आणि मालक विशाल साबळे (रा. आर्वी, जि. वर्धा). २) वाहन क्र. MH 40 CT 0022: चालक राजेश भास्कर डाबेराव (वय ४४, रा. अमरावती) आणि मालक शुभम रॉय (रा. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती). ३) वाहन क्र. MH 27 DT 2060: चालक अकबर शेख कल्लू शेख (वय ३०, मूळ रा. उत्तर प्रदेश, हाल मुक्काम अंजनगाव सुर्जी) आणि मालक शोहेब खान (रा. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती).
जप्त केलेला मुद्देमाल:
-
टाटा सिगना ४८३० हायवा (वाळूसह) – किंमत ५०,६३,१३८ रुपये.
-
टाटा एलपीटी ४९३० सोळा चाकी वाहन (वाळूसह) – किंमत ४०,६४,०३२ रुपये.
-
टाटा सिगना ट्रेलर ५५३० अठरा चाकी वाहन (वाळूसह) – किंमत ४०,६३,४५६ रुपये.
-
एकूण जप्त मुद्देमाल: १,३१,९०,६५६ रुपये.




