
वर्घ्यात खरांगना पोलिस स्टेशन हद्दीत LCB ची मोठी कार्यवाही २९ पेटी विदेशी दारूसह ५.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त!

स्थानिक गुन्हे शाखा, वर्धाची मोठी कारवाई: खरांगणा हद्दीत २९ पेटी विदेशी दारूसह ५,७४,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका कारवाईत अवैधरित्या विदेशी दारूची साठवणूक करणाऱ्या दोन आरोपींवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५ लाख ७४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन्ही आरोपींविरुद्ध खरांगणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे छापा
दिनांक ४ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक खरांगणा पोलीस स्टेशन हद्दीत गस्त (पेट्रोलिंग) घालत असताना, पोलिसांना एक गोपनीय माहिती मिळाली. मुकेश कोकाटे आणि स्नेहल काटकर (दोन्ही रा. वर्धा) यांनी काचनुर शिवार येथील भास्कर चोपडे यांच्या शेतातील विटा-मातीच्या आणि त्यावर टीना असलेल्या रूममध्ये बेकायदेशीरपणे विदेशी दारूचा साठा करून ठेवला असल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अत्यंत गोपनीयता बाळगून सदर शेतातील खोलीवर छापा टाकला.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचा तपशील
पोलिसांनी पंचांसमक्ष केलेल्या झडतीत त्या खोलीतून खालीलप्रमाणे विदेशी दारूचा साठा जप्त केला:

-
रॉयल स्टॅग कंपनीची दारू: २० खोक्यांमध्ये १८० एमएलच्या ९६० सिलबंद बाटल्या (किंमत ३,८४,००० रुपये).
-
आयकॉनीक व्हाईट कंपनीची दारू: ५ खोक्यांमध्ये १८० एमएलच्या २४० सिलबंद बाटल्या (किंमत ९६,००० रुपये).

-
रॉयल चॅलेंज कंपनीची दारू: १८० एमएलच्या १९२ सिलबंद बाटल्या (किंमत ७६,८०० रुपये).
-
ब्लेडर्स प्राईड कंपनीची दारू: ७५० एमएलचे ९ बंफर (किंमत १८,००० रुपये).

असा एकूण ५,७४,८०० रुपये किमतीचा मुद्देमाल मौकेवरच जप्त करण्यात आला.
आरोपींवर गुन्हा दाखल
या प्रकरणी आरोपी
१) मुकेश कोकाटे आणि
२) स्नेहल काटकर (दोघेही रा. वर्धा) यांच्या विरोधात पोलीस स्टेशन खरांगणा येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई), ७७(अ) आणि ८३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलीस पथकाची कामगिरी
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सौमित्र कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक राहुल इटेकार आणि पोलीस अंमलदार भूषण निघोट, धर्मेद्र अकाली, अमोल नगराळे, मंगेश चावरे यांच्या पथकाने पार पाडली.



