
नागपूर: गुन्हे शाखा युनिट ४ कडून वाहनचोरी टोळीचा पर्दाफाश; ४ दुचाकींसह ३.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर पोलिसांची मोठी कारवाई: वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ४ दुचाकींसह ३.२० लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूर: नागपूर शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट क्र. ०४ च्या पथकाने विशेष मोहीम राबवून एका आंतर-पोलीस ठाणे हद्दीतील वाहन चोरट्यांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी एका २० वर्षीय तरुणासह एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीच्या ४ दुचाकी वाहनांसह ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मानेवाडा रोडवरील विज्ञान नगर (रुस्तमजी हाईटस्जवळ) येथील रहिवासी प्रांजल अक्षय वरखेडे (वय २४) यांची ८० हजार रुपये किमतीची होंडा एक्टिवा (क्र. एमएच ३२ एझेड ३०९३) २८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२:३० ते २:०० वाजताच्या सुमारास त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली होती. या प्रकरणी त्यांनी तात्काळ तक्रार नोंदवल्यानंतर हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अशी झाली आरोपींची धरपकड
सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट क्र. ०४ चे अधिकारी व कर्मचारी करत असताना गस्तीदरम्यान गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, दोन संशयित मुले केडीके कॉलेज मैदानाजवळ चोरीच्या वाहनासह फिरत आहेत.

बातमी मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच दोन्ही मुलांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
-
ताब्यात घेतलेले आरोपी:

-
आशिष उर्फ प्रणित उर्फ रफ्तार शैलेश वाघमारे (वय २० वर्षे, रा. कडबी चौक, लुबिनी नगर, मेकोसाबाग, जरीपटका, नागपूर).
-
एक विधि संघर्षग्रस्त अल्पवयीन मुलगा.

-
४ गुन्हे उघडकीस, ताडपत्रीखाली लपवल्या होत्या गाड्या
पोलिसांनी आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी होंडा एक्टिवा चोरीची कबुली दिली. अधिक तपासात त्यांनी नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून वाहने चोरल्याचे स्पष्ट झाले:
-
हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्द: ०२ गुन्हे
-
अजनी पोलीस ठाणे हद्द: ०१ गुन्हा
-
तहसील पोलीस ठाणे हद्द: ०१ गुन्हा
आरोपींनी चोरी केलेल्या सर्व दुचाकी केडीके कॉलेजच्या आतील भागात ताडपत्रीने झाकून लपवून ठेवल्या होत्या.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (किंमत रु. ३,२०,०००/-):
-
होंडा एक्टिवा गाडी (क्र. एमएच ३२ एझेड ३०९३)
-
हिरो होंडा स्प्लेंडर (क्र. एमएच ३१ एझेड ८४२२)
-
हिरो होंडा स्प्लेंडर (क्र. एमएच ३१ एफटी ५४२९)
-
टीव्हीएस अपाचे (क्र. एमएच ४९ बीवाय ७६४०)
पुढील कारवाई आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
जप्त केलेला मुद्देमाल आणि दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी हुडकेश्वर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कामगिरी नागपूर शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सह-पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलीस उप-आयुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मपोनि संजीवनी थोरात व त्यांच्या गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.



