
आर्वी बसस्थानकात ३७ हजारांची चोरी; बुलढाणा-अकोल्यातील चार चोरांच्या मुसक्या आवळल्या!

आर्वी बसस्थानकात प्रवाशाचे ३७ हजार लांबवणारी आंतरजिल्हा चोरांची टोळी जेरबंद; बुलढाणा-अकोल्यातील चार जण पोलिसांच्या जाळ्यात!
वर्धा
वर्धा जिल्ह्यातील आर्वी बसस्थानक परिसरात गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांच्या खिशातील रोख रक्कम लांबवणाऱ्या एका कुख्यात आंतरजिल्हा चोरांच्या टोळीचा आर्वी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील चार सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून चोरीची संपूर्ण रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली ६ लाख ३७ हजार रुपयांची कार असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

काय आहे नेमकी घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागे मुकुंद बाळकृष्ण नांदुरकर (वय ७२, रा. जळगाव बेलोरा, ता. आर्वी) हे गत २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बँक ऑफ इंडिया शाखा आर्वी येथून स्वतःच्या बँक खात्यातून ४७,००० रुपये काढून आणले होते. त्यातील १०,००० रुपये किराणा दुकानदाराला उधारी चुकती करण्यासाठी दिल्यानंतर, उरलेले ३७,००० रुपयांची रोकड त्यांनी आपल्या पँटच्या खिशात ठेवली होती.

यानंतर ते आपल्या गावाला जाण्यासाठी आर्वी बसस्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर आले. जळगाव (बेलोरा) जाणारी बस फलाटावर लागताच, बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील ३७,००० रुपये लांबवले. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन आर्वी येथे भारतीय न्याय संहितेनुसार (भा.न्या.सं.) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांचे विशेष पथक आणि तांत्रिक तपासाची चक्रे वेगवान
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आर्वी पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी एक विशेष डी.बी. पथक आणि सायबर सेलची मदत घेतली. पोलिसांनी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून पाहणी केली, तसेच गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न केले.
माहिती मिळ Fi च ठाणेदारांच्या निर्देशानुसार पोलिसांचे एक पथक तातडीने रवाना करण्यात आले. पोलिसांनी सापळा रचून चारही संशयितांना ताब्यात घेतले आणि त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

जेरबंद करण्यात आलेले आरोपी:
१. अंबादास सुखदेव साळोकार (वय ४४, रा. मयुरेश्वर नगर, वडोदे ले-आउट घाटपुरी, खामगाव, जि. बुलढाणा)
२. अश्पाक पठाण उस्मान पठाण (वय ४५, रा. शेरे अली नगर वार्ड नं. ४, रायपुर, जि. बुलढाणा)

३. शोहेब खान इस्माईल खान (वय २४, रा. पांढरी प्लॉट, परपेठ मलकापूर, जि. बुलढाणा)
४. संतोष भाऊराव शिंदे (वय ३८, रा. जुनी वस्ती टांगाचौक, पहाडीपुरा, मुर्तीजापूर, जि. अकोला)
मुद्देमाल जप्त आणि पोलीस कोठडी
आरोपींना अटक करून न्यायालयात दणका देण्यात आला असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कस्टडी रिमांड सुनावली आहे. पोलिसांच्या सखोल तपासात आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली संपूर्ण ३७,०००/- रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच, गुन्हा करण्यासाठी वापरलेली ग्रे रंगाची स्विफ्ट कार (क्र. एम.एच. ३७ जी. ८२८८) ज्याची किंमत अंदाजे ६,३७,०००/- रुपये आहे, असा एकूण मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मार्गदर्शक व तपास पथक:
सदरची धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनाखाली, आर्वी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक सतिश डेहनकर यांच्या नेतृत्वात पार पडली.
या कारवाईत सायबर सेलच्या मदतीने डी.बी. पथकातील पोलीस उपनिरीक्षक महेश राठोड, पो.हवा. दिगंबर रुईकर, अमर हजारे, पो.ना. सुरेंद्र कांदे, पो.अ. सुरजसिंग बावरी, सागर पाचोडे, सुरज रिठे, अमोल गोरटे आणि मनोज असोले यांनी सहभाग घेतला. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.



