नागपुरात एम.डी. पावडरसह दोघे जेरबंद; ५२ ग्रॅम ड्रग्ससह २ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


नागपुरात गुन्हे शाखेची धडक कारवाई: ५२.७०० ग्रॅम एम.डी. पावडरसह दोघे जेरबंद; २.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त!

नागपूर (विशेष प्रतिनिधी):

शहरात अंमली पदार्थांच्या विरोधात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक मोठी कारवाई केली आहे. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी धाड टाकून तब्बल ५२.७०० ग्रॅम एम.डी. पावडरसह दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून २ लाख ६८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



अशी झाली कारवाई:

दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ४:१० ते ६:२० वाजेच्या सुमारास गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त (पेट्रोलिंग) घालत होते. यादरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, भांडेप्लॉट चौक परिसरातील विशाल मेगमार्ट समोर, सार्वजनिक रस्त्यावर एका डिओ मोपेड गाडीसह दोन तरुण एम.डी. पावडर विक्रीसाठी घेऊन उभे आहेत.



मिळालेल्या माहितीची खात्री पटताच पथकाने तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. तिथे दोन इसम संशयित हालचाली करताना दिसून आले. पोलिसांनी त्यांना त्वरित घेराव घालून ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्यांची विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे सुरज गोपाळराव कठाणे (वय ३० वर्षे) आणि हर्षल विनोद अबगड (वय २५ वर्षे, दोघे रा. नंदनवन झोपडपट्टी, गल्ली क्र. ३, पोलीस चौकीमागे, नंदनवन, नागपूर) असल्याचे सांगितले.



मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त:

संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडील झिपलॉक पन्नीमध्ये ५२.७०० ग्रॅम वजनी एम.डी. पावडर आढळून आली. पोलिसांनी एम.डी. पावडरसह ३ मोबाईल आणि एक डिओ मोपेड असा एकूण २,६८,१००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

इतर साथीदारांची नावे समोर:

पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्यांनी ही अंमली पावडर आपले इतर साथीदार



१) हाशिम शेख (वय २५ वर्षे, रा. बगडगंज, गार्डनजवळ),

२) इशांत उर्फ गोल्डी निकोलसे (वय ३५ वर्षे, रा. बगडगंज प्लास्टिक कंपनीजवळ) 



३) प्रविण टेपे (वय ३२ वर्षे, रा. पाचपावली, नागपूर) यांच्या मदतीने विक्रीसाठी आणल्याची माहिती दिली.

एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल:

आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे एम.डी. पावडर बाळगून विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे हे कृत्य कलम ८(क), २२(क), २९ एन.डी.पी.एस. ॲक्ट नुसार गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याने त्यांच्याविरुद्ध सक्करदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील कायदेशीर कारवाई साठी मुद्देमालासह सक्करदरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या रॅकेटमधील इतर फरार आरोपींचा शोध व पुढील तपास सुरू आहे.

पोलीस पथकाचे यश:

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त  विश्वास नांगरे पाटील, सह. पोलीस आयुक्त  नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे)  राजेंद्र दाभाडे, पोलीस उप-आयुक्त (डिटेक्टशन) दीपक अग्रवाल आणि सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा)  वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोनि. भारत क्षीरसागर, सपनि. आनंद बिचेवार, पोहवा इम्रान शेख, ज्ञानेश्वर भोगे, गणेश जोगकर, विवेक आढाऊ, मपोहवा. अनुप यादव, पोअं. संतोष शेंडे व नितीन राठोड यांनी पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!