
अमरावतीत मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; 21 दुचाकी जप्त, 17 गुन्ह्यांची उकल
अमरावतीत मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 21 दुचाकी जप्त, 17 गुन्हे उघड
अमरावती शहरातील सिटी कोतवाली पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांविरुद्ध मोठी कारवाई करत तब्बल 21 चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. सुमारे 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या कारवाईमुळे अमरावती शहरासह इतर भागांतील एकूण 17 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-2) श्याम घुगे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (राजापेठ विभाग) संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामदास पावले यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक तुषार गावंडे, पोलीस उपनिरीक्षक रंगराव जाधव तसेच डीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली.

अमरावती शहरातील बाजारपेठ परिसरात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या सूचनेनुसार सिटी कोतवाली पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन करून तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी राहुल संतोष सोळंके (रा. मरीमाता मंदिराजवळ, माळीपुरा, करंजा लाड, जि. वाशिम), लखन उत्तमराव चव्हाण आणि महादेव उत्तमराव चव्हाण (दोघेही रा. अळणगाव, ता. भातकुली, जि. अमरावती) यांना ताब्यात घेतले.
आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी अमरावती शहरासह विविध भागांत मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांच्या 21 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या जप्त वाहनांच्या आधारे अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील 11 आणि इतर भागांतील 6 असे एकूण 17 गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच आणखी चार मोटारसायकलींबाबत तपास सुरू असून त्यासंदर्भातील गुन्ह्यांचा शोध घेतला जात आहे.







