
तोतया CBI अधिकाऱ्यांकडून लुटलेले २५ लाख १२ तासांत जप्त; अकोला LCB कडून दोन आरोपी जेरबंद
अकोला एल.सी.बी.ची धडाकेबाज कामगिरी: तोतया सीबीआय अधिकाऱ्यांनी लुटलेली २५ लाखांची रक्कम १२ तासांत जप्त; दोन आरोपी जेरबंद
अकोला: बनावट सीबीआय (CBI) अधिकारी बनून खामगाव येथील एका व्यापाऱ्याला तब्बल २५ लाख रुपयांना लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा अकोला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या १२ तासांत पर्दाफाश केला आहे. या धडाकेबाज कारवाईत पोलिसांनी लुटलेली १०० टक्के रक्कम (२५ लाख रुपये) जप्त केली असून खामगाव येथून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

घटना काय होती?
दिनांक १९ जून २०२६ रोजी बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत सीबीआय अधिकारी असल्याचा बनाव करून काही अज्ञात बदमाशांनी खामगाव येथील एका व्यापाऱ्याकडून २५ लाख रुपयांची रोख रक्कम जबरीने हिसकावून नेली होती. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा निबंधक क्रमांक ४६८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४), ३१८(१), २०४, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
५० सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिसांचा चक्रव्यूह
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अकोल्याचे पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन लेव्हरकर यांना तात्काळ तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ३ अधिकारी आणि २० अंमलदारांचे विशेष ३ पथक तयार करण्यात आले.

या पथकाने खामगाव ते बाळापूर मार्गावरील तब्बल ५० सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बारकाईने तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपींचा माग काढला आणि त्यांना खामगाव येथून ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१. हार्दिक मनोज कुमार गुरबानी (वय २२ वर्षे, व्यवसाय- किराणा दुकान, रा. सिंधी कॉलनी, खामगाव, जिल्हा बुलढाणा).

२. साहिल नंदकिशोर नथ्थानी (वय २५ वर्षे, व्यवसाय- चाय नाश्ता हॉटेल, रा. तलाव रोड, बी एच आर नगर, खामगाव, जिल्हा बुलढाणा).
२७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यातील खालील मुद्देमाल हस्तगत केला आहे:

-
लुटलेली संपूर्ण रोकड: ₹ २५,००,०००/-
-
फिर्यादीचा अँड्रॉइड मोबाईल: ₹ १०,०००/-
-
आरोपींच्या दोन दुचाकी गाड्या: ₹ २,००,०००/-
-
आरोपींचे दोन मोबाईल: ₹ ४०,०००/-
-
एकूण जप्त मुद्देमाल: ₹ २७,५०,०००/-
तपास पथकाला २५,००० रुपयांचे बक्षीस
स्थानिक गुन्हे शाखेने दाखवलेले चातुर्य आणि सलग १२ तास रात्रं-दिवस केलेल्या अथक परिश्रमामुळे हा गुन्हा तातडीने उघडकीस आला. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी तपास पथकासाठी २५,००० रुपये रोख बक्षीस जाहीर केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता बाळापूर पोलीस करत आहेत.
कारवाई करणारे पोलीस पथक:
पो.नि. नितीन लेव्हरकर, सपोनि निलेश देशमुख, सपोनि गोपाल जाधव, पोउपनि माजीद पठाण आणि अंमलदार शेख हसन, रवि खंडारे, अब्दुल माजीद, वसीमोद्दीन, महेंद्र मलिये, भास्कर धोत्रे, किशोर सोनुने, स्वप्नील खेडकर, मंगेश इंगळे, अमोल दिपके, श्रीकांत पातोंड, राज चंदेल, राहुल गायकवाड व चालक देवानंद खरात यांनी केली आहे.




