दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांची उकल, २२ वर्षीय आरोपी गजाआड; ४.२० लाखांचे दागिने जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती

अमरावती शहर येथील सिटी कोतवाली पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका २२ वर्षीय तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून ४ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरची यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त परीमंडळ-२ श्याम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त  निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



पहिली घटना: खरेदी दरम्यान २३ ग्रॅम सोने लंपास दिनांक ३ जून २०२६ रोजी फिर्यादी वैशाली सुरेश जंवाळ (वय ४५ वर्ष, रा. चिखलदरा, अमरावती) या त्यांच्या मुलीसोबत सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास बापट चौक येथे खरेदीसाठी आल्या होत्या. बापट चौकातून खरेदी करून त्या नमुना गल्लीकडे जाणाऱ्या रोडवरील ‘सपना फुटवेअर’ जवळील एका चपलाच्या दुकानात गेल्या. तिथे चप्पल पसंत केल्यानंतर पैसे देण्यासाठी त्यांनी पर्स उघडली असता, पर्समध्ये ठेवलेले सुमारे २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात चोराने हे दागिने चोरल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर २५०/२०२६ कलम ३०३(२) बी.एन.एस. (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दुसरी घटना: आधार कार्ड अपडेटच्या रांगेत दागिने चोरीला दुसऱ्या घटनेत, फिर्यादी अस्मा बी शेख अकील (वय २८ वर्ष, रा. वलगाव, अमरावती) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या २९ जून २०२६ रोजी दुपारी १:०० वाजताच्या सुमारास अमरावती येथील जुनी तहसील कार्यालयात पतीसोबत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी गेल्या होत्या. आधार कार्ड अपडेटच्या रांगेत उभे असताना, त्यांच्या पतीने स्वाक्षरी करण्यासाठी पेन मागितला. फिर्यादीने पेन काढण्यासाठी पर्स उघडली असता, त्यात ठेवलेले सुमारे ८.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे आढळले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा रजि. नंबर ३६५/२०२५ कलम ३०३(२) बी.एन.एस. अन्वये गुन्हा नोंदवला होता.



तांत्रिक तपासातून आरोपी गजाआड, ४.२० लाखांचा मुद्देमाल जप्त वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सिटी कोतवाली पोलिसांनी तांत्रिक बाबी आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सखोल तपास केला. या तपासादरम्यान उमेश शिवलिंगदास भोसले (वय २२ वर्ष, रा. राजुरा पारधी बेडा, अमरावती) या संशयिताला ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत त्याने वरील दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून दोन्ही गुन्ह्यांतील एकूण २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत अंदाजे ४,२०,०००/- रुपये) जप्त केले आहेत.

पोलीस पथकाची कामगिरी: वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगला वाकडे, पोलीस उपनिरीक्षक तुषार गांवडे, पोउपनि रंगराव जाधव, तसेच पोलीस कर्मचारी हरिश बुंदेले, मंगेश भेलाये, प्रमोद हरणे, प्रदीप राठोड, आकाश इंगोले, बाबूसींग राठोड, मंगेश दिघेकर, अथर बेग, निलेश कांडलकर (चालक), सपोउपनी राजेश सदानशीवे आणि आनंद जाधव यांनी केली आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!