
भातकुली तालुक्यातील खोलापूर खून प्रकरणातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
अमरावती: खोलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या एका खळबळजनक खून प्रकरणातील फरार आरोपीला अमरावती ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जेरबंद केले आहे. सौरभ धर्मा शिरसाठ (वय २१ वर्षे, रा. इब्राहीमपूर, ता. भातकुली, जि. अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.सदरची यशस्वी कारवाई अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम (IPS) यांच्या आदेशाने आणि अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
घटनेची पार्श्वभूमी आणि वाद: उदापूर (ता. भातकुली) येथील रहिवासी सुनील रमेश कांबळे (वय ४० वर्षे) यांनी ९ जून २०२६ रोजी खोलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सुनील कांबळे यांच्या चुलत साळ्याने आरोपीकडून २,००० रुपये उसने घेतले होते. या पैशांच्या बदल्यात चुलत साळ्याचा मोबाईल फिर्यादी सुनील कांबळे यांच्याकडे जमा होता.

घटनेच्या दिवशी आरोपी हा मोबाईल परत घेण्यासाठी सुनील कांबळे यांच्या घरी गेला होता. तिथे मोबाईलवरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी संगनमत करून सुनील कांबळे यांच्या पोटात चाकू खुपसला. जिवे मारण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या या हल्ल्यात सुनील कांबळे गंभीर जखमी झाले होते. दुर्दैवाने, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी खोलापूर पोलिसांनी भा.न्या.स. (भारतीय न्याय संहिता) च्या कलम १०९, ३५२, ३(५), आणि १०३(१) अन्वये गुन्हा (अपराध क्रमांक ९८/२६) दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य आरोपी सौरभ शिरसाठ फरार होता.
अशी झाली अटक: ४ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर आणि त्यांचे पथक या गुन्ह्याचा तपास करत असताना, त्यांना गुप्त बातमीदाराकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली. फरार आरोपी सौरभ शिरसाठ हा यवतमाळ येथील इंदिरा नगर भागात त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीकडे लपून राहिला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने यवतमाळ येथे जाऊन सापळा रचला आणि आरोपी सौरभ धर्मा शिरसाठ याला ताब्यात घेतले. पोलिसांनी या गुन्ह्याबाबत त्याची कसून चौकशी केली असता, त्याने सुनील कांबळे यांच्या खुनाची कबुली दिली. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला खोलापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलीस पथक:

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकअशोक लांडे यांच्या नेतृत्वात पो.उप.नि. मूलचंद भांबुरकर, पोलीस अंमलदार सुधीर बावणे, मंगेश लकडे, सचिन मसांगे, दिनेश कनोजीया, सायबर सेलचे सागर धापड, शिवा शिरसाठ आणि चालक हर्षद घुसे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.





