
२२ वर्षांपासून फरार असलेला खुनी हल्ल्याचा आरोपी ब्रह्मपुरी पोलिसांच्या जाळ्यात

चंद्रपूर/ब्रह्मपुरी :-

पत्नीवर प्राणघातक हल्ला करून तब्बल २२ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा फरार आरोपी अखेर ब्रह्मपुरी पोलिसांच्या हाती लागला आहे. रमेश झिंगूजी खानोरकर (रा. कूर्झा, ब्रह्मपुरी) असे या ५२ वर्षीय अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो गेल्या २२ वर्षांपासून आपली खरी ओळख लपवून नागपूर लगतच्या मौजा नरसाळा येथे राहत होता.

घटनेची पार्श्वभूमी (सन २००४)
सन २००४ मध्ये ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी रमेश खानोरकर याने कौटुंबिक वा इतर कारणातून आपल्या पत्नीवर प्राणघातक हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते. गुन्हा घडल्यापासूनच आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. तो सातत्याने फरार राहिल्यामुळे न्यायालयाने त्याला ‘फरार’ घोषित केले होते. ब्रह्मपुरी पोलीस गेल्या २२ वर्षांपासून त्याचा सतत शोध घेत होते.
अशी रचली सापळा आणि कारवाई
नुकतीच ब्रह्मपुरी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली की, नागपूर जिल्ह्यातील मौदा/कन्हान परिसरातील मौजा नरसाळा येथे एक इसم मागील काही वर्षांपासून अगदी एकटाच राहत आहे. त्याचे कोणतेही नातेवाईक त्याला भेटायला येत नाहीत आणि तो सुद्धा कोणाच्या फारसा संपर्कात जात नाही.

या गोपनीय माहितीच्या आधारे ब्रह्मपुरी पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे आणि हुशारीने या इसमाची पडताळणी केली. तो इसम दुसरा तिसरा कोणी नसून २२ वर्षांपूर्वी ब्रह्मपुरी येथील पत्नीच्या खूनाचा प्रयत्न करणारा फरार आरोपी रमेश झिंगुजी खानोरकर असल्याबाबत पोलिसांची खात्री पटली. तो गेल्या २२ वर्षांपासून आपली ओळख व नाव बदलून राहत होता.
आरोपीला पोलिसांच्या हालचालींचा सुगावा लागू नये म्हणून पोलिसांनी अत्यंत सावधगिरी बाळगत १३ ऑक्टोबर २०२६ रोजी त्याच्या लपण्याच्या ठिकाणावर अचानक छापा टाकला आणि त्यास ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपला गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यास अटक केली असून पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.

पोलीस पथकाचे यश
सदर यशस्वी कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:
-
मार्गदर्शन: पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, मा. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर, आणि पोलीस निरीक्षक कांचन पांडे.

-
कारवाई करणारे पथक: सपोनिरी मनोज खडसे, पोलीस हवालदार मुकेश गजबे, मिलिंद नैताम, तसेच पोलीस अंमलदार प्रवीण भिवगडे, इर्शाद खान, निलेश तुमसरे, स्वप्नील पळसपगार आणि वशिष्ठ रंगारी.
पोलिसांच्या या दीर्घकालीन व धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.




