
वाशीम: ४५.९ लाखांची शेतकरी फसवणूक करणारा फरार आरोपी १ वर्षानंतर पंजाबमधून अटक

वाशीम :-
वर्षभर रात्रंदिवस काबाडकष्ट करून पिकवलेला शेतीमाल खरेदी करायचा आणि त्याचे पैसे न देता शेतकऱ्यांची फसवणूक करायची, असा प्रकार वाशीम शहरात समोर आला होता. या प्रकरणी सुमारे ४५ लाख ९० हजार ५२ रुपये इतक्या मोठ्या रक्कमेची फसवणूक करून गेल्या १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अखेर वाशीम स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पंजाबमधील जालंधर येथून बेड्या ठोकल्या आहेत. अवतारसिंग बळवंतसिंग सचदेव (रा. वाशीम) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नेमके प्रकरण काय आहे?
बळीराजा वर्षभर शेतात कष्ट करून शेतीमालाचे उत्पादन घेतो. या शेतीमालाच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरच शेतकऱ्यांचे संपूर्ण वार्षिक आर्थिक गणित आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. मात्र, आरोपी अवतारसिंग सचदेव याने वाशीम शहरातील अनेक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर शेतीमाल खरेदी केला.

माल खरेदी केल्यानंतर ठरलेली रक्कम अदा न करता शेतकऱ्यांची एकूण ४५,९०,०५२ रुपयांची आर्थिक फसवणूक केली आणि तो पसार झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

१ वर्षापासून सुरु असलेला शोध अन् जाळ्यात अडकला आरोपी
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वाशीम पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला होता. आरोपी मागील एका वर्षापासून पोलिसांना गुंगारा देऊन राज्याबाहेर लपून बसला होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला. आरोपी पंजाब राज्यातील जालंधर येथे लपल्याची पक्की माहिती मिळताच, पोलीस पथकाने तिथे धाव घेऊन त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.

आर्थिक गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू
आरोपीला वाशीम येथे आणण्यात आले असून, त्याने शेतकऱ्यांची फसवणूक नेमकी कोणत्या पद्धतीने केली? व्यवहाराची बनावट कागदपत्रे कशी तयार केली? तसेच या फसवणुकीत त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का? या सर्व बाबींचा सखोल तपास आता आर्थिक गुन्हे शाखा, वाशीम करत आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक
ही यशस्वी कारवाई वाशीमचे पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पार पडली.

पथकातील अधिकारी व अंमलदार:
-
नेतेत्व: सुधाकर आढे (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वाशीम)
-
सहभाग:
-
निलेश जाधव (पोलीस उपनिरीक्षक)
-
प्रदिप चव्हाण (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक)
-
महेश वानखेडे (पोलीस हवालदार)
-
मंगेश गोपनारायण (पोलीस हवालदार)
-
गोपाल चौधरी (पोलीस अंमलदार)
-
स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली असून, वाशीम पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांमधून व शेतकरी वर्गातून कौतुक केले जात आहे.




