
पुलगाव पोलिसांची कारवाई: ७ लाखांच्या दारूसह चारचाकी जप्त, दोन शेतकरी जागीच जेरबंद!

पुलगाव पोलिसांची मोठी कारवाई: ७ लाख १५ हजारांच्या अवैध देशी दारूसह चारचाकी वाहन जप्त; दोन शेतकरी अटकेत
पुलगाव (वर्धा) : वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असतानाही सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर पुलगाव पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून पुलगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेल्या सापळ्यात ऋषिराज ढाब्याजवळ एका चारचाकी वाहनाच्या डिक्कीतून तब्बल १५,००० रुपये किमतीची देशी दारू आणि ७ लाख रुपयांचे वाहन असा एकूण ७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी होती कारवाईची हकीकत:
दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६:०५ ते ६:४५ वाजेच्या सुमारास पुलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई सोमेश गंधाडे व पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, ऋषीराज ढाब्याजवळ (ता. देवळी, जि. वर्धा) नाकाबंदी करण्यात आली. यादरम्यान संशयितरीत्या येणाऱ्या ‘एस. एक्स. फोर’ (Maruti Suzuki SX4 VXI, क्र. MH 31 DK 6458) या चारचाकी वाहनाची पंचांसमक्ष पंचानामा करून झडती घेण्यात आली.


तपासणीदरम्यान वाहनाच्या मागील डिक्कीमध्ये एका आकाशी रंगाच्या पिशवीत बॅच क्रमांक ५४० असलेले, ९० मिली क्षमतेचे देशी दारूचे प्रत्येकी १०० रुपये किमतीचे एकूण १५० सिलबंद नाग (निप) मिळून आले. पोलिसांनी दारूसाठ्यासह ७ लाख रुपये किमतीचे जुने वापरते वाहन असा एकूण ७,१५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपींची नावे:
या प्रकरणी पोलिसांनी खालील दोन आरापींना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे:

१. निलेश प्रकाश मुन (वय ४० वर्षे, धंदा: शेती)
२. अविनाश रामदासजी वानखेडे (वय २६ वर्षे, धंदा: शेती) (दोन्ही रा. सोनेगाव आबाजी, ता. देवळी, जि. वर्धा)

मार्गदर्शन व यशस्वी कामगिरी:
सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या निरीक्षक सदाशिव ढाकणे यांच्या सूचनेनुसार पुलगाव पोलीस स्टेशनचे अंमलदार विनोद रघाटाटे, संदीप बोरबन, अजय अनंतवार, उमेश बेले आणि सोमेश गंथाडे यांच्या पथकाने पार पाडली. अवैध धंद्यांवर पुलगाव पोलिसांच्या या कठोर कारवाईमुळे तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.




