हिंगणघाटचा कुख्यात गुंड रविन्द्र डेकाटे एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत छत्रपती संभाजीनगर कारागृहात स्थानबद्ध!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


हिंगणघाटमधील कुख्यात गुंड व अवैध दारूविक्रेता रविन्द्र डेकाटे तडकाफडकी एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध!

वर्धा :- पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत दहशत माजविणारा आणि अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला धोकादायक व्यक्ती तथा अवैध दारूविक्रेता रविन्द्र तुकाराम डेकाटे (वय ४१ वर्षे, रा. संत चोखोबा वार्ड, हिंगणघाट, जि. वर्धा) याच्यावर प्रशासनाने अत्यंत कठोर पाऊल उचलत एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्यांतर्गत छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याची कारवाई केली आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी व दहशत:

आरोपी रविन्द्र तुकाराम डेकाटे याच्याविरुद्ध हिंगणघाट पोलीस स्टेशनमध्ये सन २०२० पासून साथीदारांसह मिळून खालीलप्रमाणे एकूण ०८ गंभीर गुन्हे नोंद आहेत:



  • अश्लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी देणे व दुखापत करणे.



  • खुनाचा प्रयत्न करणे.



  • घरफोडी/गृह आगळीक करून शिवीगाळ व मारहाण करणे.

  • साथीदारांसह गावठी मोहा दारूची तस्करी व विक्री करणे.



  • हद्दपार असताना सुध्दा प्रतिबंधीत क्षेत्रात प्रवेश करून गुन्हे करणे.

सन २०२० पासून त्याने हिंगणघाट परिसरात जनसामान्यांच्या मनात प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्याच्या भीतीपोटी कोणताही पीडित व्यक्ती पोलिसांत तक्रार देण्यास पुढे येत नव्हता, ज्यामुळे परिसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती. त्याच्यावर अनेक प्रतिबंधक कारवाया (उदा. मपोका कलम ५६, १५१, १०७, ११० इत्यादी) करण्यात आल्या होत्या, परंतु तो कशाचीही पर्वा न करता सतत गुन्हे करत राहिला.



प्रशासनाची कठोर कारवाई:

हिंगणघाटचे पोलीस निरीक्षक श्री. अनिल राऊत यांनी आरोपीच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हाथभट्टीवाले, धोकादायक व्यक्ती अधिनियम १९८१ अन्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव वर्धाचे पोलीस अधीक्षक  सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्फत जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्याकडे सादर करण्यात आला.

या प्रस्तावाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी ०६ नोव्हेंबर २०२६ रोजी रविन्द्र डेकाटे यास स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले, त्यानुसार त्यास तात्काळ छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले आहे.

वर्धा पोलिसांचा इशारा व कामगिरी:

वर्धा जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था अबाधित राहावी आणि सण-उत्सव शांततेत पार पाडावेत यासाठी अवैध दारूविक्रेते व गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत अशीच कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी श्रीमती वान्मथी सी. आणि पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिला आहे.

  • वर्ष २०२५: एकूण १८ दारूविक्रेते आणि गुंडांना एम.पी.डी.ए. अंतर्गत कारागृहात डांबण्यात आले होते.

  • वर्ष २०२६ (सद्यस्थिती): चालू वर्षात आतापर्यंत १३ गुंड प्रवृत्तीच्या व अवैध दारूविक्रेत्या व्यक्तींवर ही कारावायी करण्यात आली आहे.

कारवाई करणारे पथक:   सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक  सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक  सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल महाडीक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन हिंगणघाटच्या पथकाने (पो.नि. अनिल राऊत व इतर अंमलदार) पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!