
एटीएममधून पैसे परत करण्याचे सांगून फसवणूक; पश्चिम बंगालमधील सायबर भामटा कोलकाता येथून जेरबंद

बँक कर्मचारी असल्याचे भासवून मोबाईलवर बनावट एपीके (APK) फाईल पाठवून बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवत ५ लाख ४३ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय सायबर भामट्याला सायबर पोलीस ठाणे, चंद्रपूरच्या विशेष पथकाने पश्चिम बंगालमधील कोलकाता येथून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आरोपीची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
या प्रकरणातील ५८ वर्षीय फिर्यादी शालेय मुख्याध्यापिकेने ३० ऑगस्ट २०२६ रोजी अकक्सिस बँकेच्या एटीएममधून ५,००० रुपये काढण्याचा प्रयत्न केला असता, एटीएममधून ९०० रुपये कमी आले. याबाबत त्यांनी बँकेत रीतसर तक्रार नोंदवली होती. त्यानंतर फिर्यादींना एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. समोरच्या व्यक्तीने बँक कर्मचारी असल्याचे भासवून, “तुमच्या एटीएममधून ९०० रुपये कमी आले आहेत का?” अशी विचारणा करून त्यांचा विश्वास संपादन केला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे सपोनि निलेश गिरी, पोलीस अंमलदार राहुल पोंदे, अनिमेश भोंगळे व पंकज बावणे यांच्या विशेष पथकाने पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने सलग ४ दिवस-रात्र कसोशीने शोध घेतला.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल गाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास व अटक पथकाने पार पाडली. यामध्ये सपोनि निलेश गिरी, पोअं राहुल पोंदे, अनिमेश भोंगळे, पंकज बावणे आणि इतर सहकारी अधिकारी व अंमलदारांचा सहभाग होता.

-
बँक अधिकारी किंवा कर्मचारी कधीही फोनवर गोपनीय माहिती मागत नाहीत किंवा अनोळखी लिंक पाठवत नाहीत.





