नागपूर:खापरखेडा पोलिसांची कारवाई अग्निशस्त्राने गोळीबार करून ११.८५ लाख लुटणारा दरोडेखोर गुजरातच्या कारागृहातून जेरबंद

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


खापरखेडा पोलिसांची आंतरराज्यीय कारवाई ज्वेलर्स व्यावसायिकावर गोळीबार करून ११.८५ लाखांचा ऐवज लुटणारा आरोपी गुजरातच्या कारागृहातून जेरबंद

नागपूर:



खापरखेडा परिसरात एका ज्वेलर्स व्यावसायिकावर अग्निशस्त्राने गोळीबार करून सुमारे ११ लाख ८५ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीतील एका मुख्य आरोपीला नागपूर शहर पोलिसांच्या खापरखेडा पथकाने गुजरातच्या कारागृहातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. तब्बल चार राज्यांत तपास आणि ३८८ मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली आहे.



काय होती घटना?



फिर्यादी मंगेश केशवरावजी मारोतकर (वय ३५, रा. वलनी, ता. सावनेर, जि. नागपूर) यांचे खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव येथे ‘महालक्ष्मी ज्वेलर्स’ नावाचे दुकान आहे. २३ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ८.१५ वाजता दुकान बंद करून ते सोन्या-चांदीचे दागिने व रोकड घेऊन घरी जात होते. दरम्यान, वलनी येथील धनगिरी बाबा मंदिर परिसरात दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी आरोपींनी त्यांना अडवले. आरोपींनी अग्निशस्त्राचा धाक दाखवून त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात मारोतकर जखमी झाले, तर आरोपींनी त्यांच्याकडील अंदाजे ११,८५,००० रुपये किमतीचे दागिने व रोकड हिसकावून पळ काढला. याप्रकरणी खापरखेडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६), ३(५) व भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चार राज्यांत तपास आणि कारागृहातून अटक:



सुरुवातीला कोणताही ठोस धागा नसताना पोलिसांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे, रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि कारागृहातून सुटलेल्या आरोपींची कसून पडताळणी केली. तसेच, तब्बल ३८८ मोबाईल क्रमांकांचे सीडीआर (CDR) विश्लेषण केले आणि महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश व राजस्थान या चार राज्यांत समन्वय साधून तपास सुरू केला.

गुन्ह्याच्या पद्धतीवरून (मोडस ऑपरेंडी) पोलिसांनी संशयित आरोपी अशोक रमेश प्रजापती (वय ३०, मूळ रा. धौलपूर, राजस्थान) याचा गुन्ह्यापूर्वी खापरखेडा परिसरात वास्तव्य असल्याचे निष्पन्न केले. पोलिसांनी राजस्थानमध्ये त्याचा शोध घेतला असता, तो गुजरात राज्यातील भुज-पालारा मध्यवर्ती कारागृहात एका गोळीबार व दरोड्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असल्याचे समोर आले. खापरखेडा पोलिसांनी तत्काळ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून प्रोडक्शन वारंटद्वारे त्याला ताब्यात घेतले आणि नागपूर येथे आणून अटक केली. चौकशीत त्याने इतर तीन साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.



कारवाई करणारे पोलीस पथक:

ही यशस्वी कामगिरी नागपूर शहर पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रादेशिक विभाग) राजेंद्र दाभाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ-५) निकेतन कदम आणि सहायक पोलीस आयुक्त (कळमना विभाग) विशाल क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. खापरखेडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र कारेमोरे, पोलीस हवालदार राजू निखाडे, चंद्रकांत गजभिये, राजू मोहिले, पोलीस अंमलदार अविनाश पेंदाम, विशाल घोरपडे, रविंद्र गभने, पंकज वाघमारे तसेच परिमंडळ-५ चे पोलीस हवालदार प्रभाकर मानकर आणि सायबर सेलचे पोलीस अंमलदार मुकेश राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आरोपीचे नागपूरमधील वास्तव्य, गुन्ह्यातील फरार साथीदार आणि लुटलेला मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!