
अमरावती ग्रामीण: लोणी हायवेवर दरोडा टाकणारे ४ आरोपी जेरबंद, १.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखा (अमरावती ग्रामीण) च्या पथकाने लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर दरोडा/जबरी चोरी करणाऱ्या ४ आरोपींना अकोला येथून अटक केली आहे.
घटना आणि पार्श्वभूमी: दिनांक ०५/०८/२०२६ रोजी सकाळी ७:५० वाजेच्या सुमारास तक्रारदार सुनील एकनाथराव अजमिरे (वय ५५ वर्ष) हे आपल्या मोटरसायकलने (MH 27 DN 4862) अमरावतीवरून अकोली जहागीर येथे जात होते. लोणी हद्दीतील बेलोरा गावाच्या समोर हायवे रोडवर VJV फार्मजवळ चार अनोळखी व्यक्तींनी त्यांची चालती दुचाकी थांबवून चावी काढून घेतली. त्यानंतर मोबाईल आणि गाडीची चावी शेतात फेकून देऊन खिशातील २,००० रुपये रोख रक्कम जबरीने हिसकावून घेतली. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कारवाई आणि अटक: अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्हा खडकी (अकोला) येथील रितेश महापात्रा व त्याच्या साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाले. पथकाने अकोला रेल्वे स्टेशन परिसरातून आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी:

-
रितेश केशव महापात्रा (वय २४ वर्षे, रा. खडकी, अकोला)
-
गौरव विनोद डोंगरे (वय १९ वर्षे, रा. खडकी, अकोला)

-
श्रेयस उमेश इंगळे (वय २० वर्षे, रा. कानेरी, ता.जि. अकोला)
-
एक विधीसंघर्षग्रस्त बालक (रा. खडकी, अकोला)

जप्त केलेला मुद्देमाल:
-
नगदी रक्कम: ₹२,०००/-
-
गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल: (MH 30 BY 2480 – किंमत सुमारे ₹५५,०००/-)
-
३ मोबाईल फोन: (किंमत ₹४५,०००/-)
-
पावर बँक: (किंमत ₹१,०००/-)
-
एकूण जप्त मुद्देमाल: ₹१,०३,०००/-
गुन्ह्याचा पुढील तपास लोणी पोलीस करत आहेत.




