धाडसी दरोडा उघड! गोंदिया एलसीबीची धडक कारवाई, तांदुळाचा लुटलेला ट्रक हस्तगत

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

१८.१३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, एका आरोपीला अटक

गोंदिया: मौजा सावरी हद्दीत चाकूचा धाक दाखवून ३० टनांपेक्षा जास्त तांदूळ आणि ट्रक लुटणाऱ्या टोळीचा गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी लुटलेला ट्रक आणि तांदूळ असा एकूण १८,१३,६९९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.



प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी व ट्रक चालक नवीन रामचंद मौर्या (वय ३५) हे १४ जुलै २०२६ रोजी चाकघाट (मध्य प्रदेश) येथून ३० टन ७६५ किलो तांदूळ घेऊन सडक अर्जुनी (जि. गोंदिया) कडे चालले होते.

१६ जुलैच्या रात्री १२.०० वाजेच्या सुमारास त्यांना झोप येत असल्याने त्यांनी मौजा सावरी येथील बस स्टॉपजवळ ट्रक उभा केला. १७ जुलैच्या पहाटे ४:०० वाजेच्या सुमारास एका अनोळखी इसमाने ट्रक जवळ येऊन पिण्याचे पाणी मागितले. चालकाने पाणी दिले असता, तिथे आणखी तीन अनोळखी इसम आले.



त्यांनी चालकाला मारहाण करून खाली उतरवले आणि चाकूचा धाक दाखवून जवळच एका झाडाला दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर आरोपी १० लाख रुपयांचा ट्रक आणि त्यात भरलेला ८ लाख रुपये किमतीचा तांदूळ (एकूण १८ लाख रुपये) जबरदस्तीने पळवून घेऊन गेले. याप्रकरणी रावणवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासाची चक्रे आणि आरोपीचा शोध

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गोंदियाचे पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रेवचंद सिंगनजुडे यांना तात्काळ तपासाचे निर्देश दिले. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने दोन विशेष पथके तयार करून तपास सुरू केला.



तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे मौजा कोहका (पो.स्टे. गंगाझरी) येथील संजयकुमार राजकुमार दमाहे (वय २०) व त्याच्या साथीदारांनी ही लूट केल्याचे निष्पन्न झाले. १९ जुलै २०२६ रोजी पोलिसांनी कोहका येथून संजयकुमारला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, १७ जुलैच्या सकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास त्याच्या मित्राने इतर ३ साथीदारांसह तांदळाचा ट्रक लुटल्याचे सांगून तांदूळ लपवण्यास मदत मागितली होती. त्यानुसार त्यांनी कोहका ते भानपूर रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करून हमालांच्या मदतीने तांदूळ तीन वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवला होता.



जप्त केलेला मुद्देमाल:

पोलीस पथकाने आरोपीच्या सांगण्यावरून ३ वेगवेगळ्या ठिकाणांवरून खालील मुद्देमाल जप्त केला:

  • तांदूळ (एकूण ३० टन १०७ किलो):

    • ११ टन ३२० किलो (किंमत: ₹३,०६,४५०/-)

    • ११ टन ४६० किलो (किंमत: ₹३,०९,४२०/-)

    • ७ टन ३२७ किलो (किंमत: ₹१,९७,८२९/-)

    • तांदळाची एकूण किंमत: ₹८,१३,६९९/-

  • टाटा कंपनीचा ट्रक: किंमत ₹१०,००,०००/-

  • एकूण जप्त मुद्देमाल: ₹१८,१३,६९९/-

    पुढील कारवाई

अटक करण्यात आलेल्या संजयकुमार राजकुमार दमाहे (वय २०, रा. कोहका) याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी रावणवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा पोलीस कसोशीने शोध घेत आहेत.

ही धडक कारवाई गोंदियाचे पोलीस अधीक्षक  गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, सपोनि अमरदीप खाडे, सपोनि अभिषेक जंगमवार, सायबर सेलचे सपोनि देविदास ठमके व एलसीबी/सायबर सेलच्या संपूर्ण अंमलदार पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!