
अमरावती ग्रामीण LCB ची धडक कारवाई: फरार दुचाकी चोरट्याला ठोकल्या बेड्या; ५५ हजारांच्या २ सायकली जप्त!
अमरावती :-
अमरावती ग्रामीण जिल्ह्यामध्ये चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि प्रलंबित गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अभियानांतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत, मोटरसायकल चोरीच्या प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला अखेर बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून ५५,००० रुपये किमतीच्या २ विनाक्रमांकाच्या हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

दिनांक २६ जून २०२६ रोजी पोलीस ठाणे वरूड येथे निलेश वैजनाथ मेश्राम (रा. वरूड) यांच्या तक्रारीवरून अप. क्र. ३६३/२०२६, कलम ३०३(२) भा.न्या.सं. अंतर्गत मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत असताना, ३ जुलै २०२६ रोजी पथकाने गुन्ह्यात चोरीस गेलेली पहिली मोटरसायकल जप्त करण्यात यश मिळवले होते. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी घटनेच्या दिवसापासूनच फरार होता आणि पोलीस त्याच्या मागावर होते.

दिनांक २८ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोर्शी-वरूड उपविभागात गस्त (पेट्रोलिंग) घालत असताना, पथकाला गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. सदर गुन्ह्यातील फरार आरोपी बेनोडा येथे आल्याची खात्रीशीर बातमी मिळताच पोलिसांनी तत्काळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
अमरावती आणि नागपुरातून चोऱ्या; मध्य प्रदेशात ठेवल्या होत्या गहाण!
पोलिसांनी आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याने वरूड येथील गुन्ह्याची कबुली तर दिलीच, शिवाय अमरावती शहर आणि नागपूर येथून आणखी दोन मोटरसायकली चोरी केल्याचे उघड केले.

तसेच चोरी केलेल्या दोन्ही दुचाकी त्याने कुंभीखेडा (तह. पट्टन, जि. बैतुल, मध्य प्रदेश) येथे गहाण ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने तेथे जाऊन ५५ हजार रुपये मूल्याच्या २ हिरो स्प्लेंडर प्लस (विना क्रमांकाच्या) मोटरसायकली पंचासमक्ष जप्त केल्या.
आरोपीची माहिती:
-
नाव: राम उर्फ शुभम सुभाष जाधव

-
वय: २२ वर्षे
-
राहणार: बेनोडा, ता. वरूड, जि. अमरावती
पोलीस पथक व मार्गदर्शन:
ही धडक व यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम (भापोसे) आणि अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
-
नेतृत्व: पोलीस निरीक्षक श्री. अशोक लांडे (स्थानिक गुन्हे शाखा)
-
कारवाईत सहभागी पथक: पोउपनि. आकाश शिवणकर, पो.हवा. चेतन दुबे, सचिन गायधने, संदीप वानखडे, रूपेश गावंडे, प्रशांत वैद्य, आणि चालक प्रज्वल राऊत.




