
गोंदिया LCB ची धडाकेबाज कारवाई: बॅटरी चोरणाऱ्या दोघांसह कबाडी दुकानदाराला अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त
सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोल पम्पावरून ट्रक व ट्रॅक्टरच्या बॅटरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींसह चोरीचा माल खरेदी करणाऱ्या कबाडी दुकानदाराला गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अटक केली आहे. या धडाकेबाज कारवाईत पोलिसांनी ३७,००० रुपये किमतीच्या एकूण ७ बॅटरी हस्तगत केल्या आहेत. डोंगरगाव (जि. गोंदिया) येथील रहिवासी कॉमेन्द्र खेमराज मेंढे यांनी ५ ऑगस्ट २०२६ रोजी सालेकसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. २ ऑगस्ट ते ३ ऑगस्ट २०२६ च्या दरम्यान रात्रीच्या वेळी सावली येथील पेट्रोल पम्प परिसर (सलोनी/काळे पेट्रोल पम्प) येथे ठेवलेल्या ३ ट्रक आणि १ ट्रॅक्टरमधून अज्ञात चोरट्यांनी ७ बॅटरी चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी सालेकसा पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये (अपराध क्र. ३७६/२६) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून आरोपी गजाआड

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गोंदियाचे पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे आणि एलसीबी निरीक्षक श्री. रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे छोटा गोंदिया परिसरातून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले:
-
आतिष शंकर रहांगडाले (वय ३१ वर्षे, रा. छोटा गोंदिया)

-
ऋत्विक बस्तीराम कंटकार (वय २५ वर्षे, रा. छोटा गोंदिया)
कडक चौकशीदरम्यान त्यांनी भाड्याने चारचाकी वाहन घेऊन आमगाव ते देवरी रोडवरील सावली येथून वाहनांच्या बॅटरी चोरल्याची कबुली दिली. ही चोरी केलेली मालमत्ता त्यांनी फुलचूर येथील कबाडी व्यावसायिक कैलास संजय चौधरी (वय ३५ वर्षे, रा. प्रिन्स चौक, फुलचूर) याला विकल्याचे निष्पन्न झाले.

हस्तगत केलेला मुद्देमाल
कबाडी दुकानातून जप्त केलेल्या ३७,००० रुपयांच्या बॅटरीचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

-
अमरॉन (Amaron) कंपनी बॅटरी: ४ नग (अंदाजे किंमत ₹२२,०००/-)
-
पावरजोन (Powerzone) कंपनी बॅटरी: १ नग (अंदाजे किंमत ₹६,०००/-)
-
एस. एफ. (SF) कंपनी बॅटरी: १ नग (अंदाजे किंमत ₹५,०००/-)
-
विना स्टिकर बॅटरी: १ नग (अंदाजे किंमत ₹४,०००/-)
पोलीस पथकाची कामगिरी
तिन्ही आरोपींना जप्त केलेल्या मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी सालेकसा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही धडाकेबाज कामगिरी गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. सुबोधकुमार बिसेन, पो.हवा. विठ्ठल ठाकरे, पो.हवा. दिक्षीतकुमार दमाहे, पो.हवा. संजय चौहान, पो.शि. हंसराज भांडारकर, पो.शि. छगन विठ्ठले आणि चापोशि. राम खंदारे या पथकाने पार पाडली.




