
स्थानिक गुन्हे शाखेकडून गांजासह कार जप्त, तिघांवर गुन्हा दाखल
धुळे स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका मोठ्या कारवाईत सुमारे १६ किलो ६६४ ग्रॅम गांजा जप्त केला असून, या प्रकरणी तीन जणांविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हा दाखल केला आहे.
धुळे-शिरपूर महामार्गावर सापळा धुळ्याहून शिरपूरकडे जाणाऱ्या एका मारुती सुझुकी सियाज कारमधून (क्रमांक MH-47/C-1008) मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गांजाची बेकायदेशीर विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून धुळे ते शिरपूर महामार्गावरील हॉटेल डी.डी.आर.सी. समोर सापळा रचण्यात आला. संशयित कार येताच पोलिसांनी ती अडवून तिची झडती घेतली.

दोन आरोपींना अटक, एक फरार कारची तपासणी केली असता पोलिसांना त्यात मोठ्या प्रमाणावर गांजा मिळून आला. याप्रकरणी पोलिसांनी कारमधील दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत: १) विनेश गुलाब पावरा (वय ३२, रा. उमर्दा, ता. शिरपूर, जि. धुळे) २) ताराचंद उत्तरसिंग वळवी (वय ३४, रा. उमर्दा, ता. शिरपूर, जि. धुळे)
ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली असता, त्यांनी हा गांजा इरफान शकील पिंजारी याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. आरोपी इरफान पिंजारी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

९ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी एकूण ९,१२,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, ज्यामध्ये:

-
गांजा: ४,१२,००० रुपये किमतीचा १६ किलो ६६४ ग्रॅम गांजा (प्रति किलो २५,००० रुपये दर).
-
वाहन: ५,००,००० रुपये किमतीची मारुती सुझुकी सियाज कार.

गुन्हा दाखल या प्रकरणी धुळे येथील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) च्या कलम ८(क), २०(ब), २(क), २२(क), २९ अन्वये गुन्हा (गु.र.नं. २११/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक:-
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, तसेच पोलीस अंमलदार प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, अमोल पाटील, विनायक खैरनार, हर्षल चौधरी, राणी दामोदर, जगदीश सूर्यवंशी आणि सिद्धार्थ निकम यांच्या पथकाने केली आहे.




