
सिद्धेश्वर महादेव मंदिर चोरीचा २४ तासांत छडा; आरोपी मुद्देमालासह जेरबंद
बुलढाणा: बुलढाणा येथील करहाळे ले आउट परिसरातील सिद्धेश्वर महादेव मंदिरात झालेली चोरी स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत उघडकीस आणली आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. ६४ वर्षीय फिर्यादी रामकृष्ण हरीचंद्र राठोड (रा. करहाळे ले आउट, बुलढाणा) यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, १६ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी १२.०० वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्याने मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि मंदिरातील देव-देवतांचे चांदी व तांब्याचे दागिने व साहित्य चोरून नेले.
चोरीला गेलेला मुद्देमाल (एकूण किंमत १८,५५०/- रुपये)

-
श्री. सिद्धेश्वर महादेव संस्थान, करहाळे ले आउट असे लिहिलेली तांब्याची मोठी जलधारा (किंमत रु. ४०००/-)
-
श्री. सिद्धेश्वर महादेव संस्थान, दि. ०६.०४.२०२६ असे लिहिलेली तांब्याची छोटी जलधारा (किंमत रु. २२५०/-)

-
महादेव मंदिर असे लिहिलेली दीड फुटाची पितळी समई (किंमत रु. २०००/-)
-
श्री. सिद्धेश्वर महादेव संस्थान, क-हाळे ले आउट, बुलढाणा असे लिहिलेले चांदीचे देवीचे नाक (किंमत रु. ३००/-)

-
मारोती मंदिर येथील चांदीचे दोन डोळे (किंमत रु. ४०००/-)
-
चांदीचे दोन डोळे (किंमत रु. ३०००/-)

-
नंदीचे चांदीचे दोन डोळे (किंमत रु. ३०००/-)
या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अप.क्र. ६४९/२६ कलम ३०५(D) बी.एन.एस (BNS) २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांचा तपास आणि आरोपीला अटक: गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशिष रोही यांना तात्काळ तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने परिसरातील सीसीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले.
तपासादरम्यान पोलिसांना संशयित आरोपी आकाश शिवरतन बाहेती (वय ५० वर्षे, रा. पवार ले आउट, बुलढाणा) याची ओळख पटली. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, हा आरोपी मंदिरातून चोरलेले साहित्य विकण्यासाठी चालला आहे. त्यानुसार पोलिसांनी श्री. शिवाजी शाळा, बुलढाणा येथून भिलवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्याला ताब्यात घेतले.
गुन्ह्याची कबुली आणि मुद्देमाल जप्त: पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने करहाळे ले आउट येथील सिद्धेश्वर महादेव मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून मंदिरातून चोरलेला संपूर्ण १८,५५०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, पुढील कारवाईसाठी त्याला बुलढाणा शहर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
तपास पथक: ही धडक कारवाई बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशिष रोही, सपोनि सुनील इंगळे, पोहेकॉ दीपक लेकुरवाळे आणि चांद शेख यांनी पार पाडली.




