
इलेक्ट्रिक पोलवरील ॲल्युमिनियमच्या तारा चोरणारी टोळी गजाआड; सातारा एलसीबी आणि पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई
पुसेगाव: गेल्या सहा महिन्यांपासून पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत महावितरणच्या (MSEDB) इलेक्ट्रिक पोलवरील ॲल्युमिनियमच्या तारा चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. वारंवार घडणाऱ्या या चोऱ्यांमुळे स्थानिक शेतकरी आणि नागरिक त्रस्त झाले होते. या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत सातारा स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि पुसेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आंतरजिल्हा तार चोरी करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत एकूण ५ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, आरोपींकडून तब्बल ११,४३,६००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथके तैनात:- तारा चोरीच्या वाढत्या घटनांमुळे सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके आणि पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांनी तपासाची चक्रे फिरवली.

सायबर सेल आणि गोपनीय बातमीदारांची मदत पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी चोरी झालेल्या विविध घटनास्थळांना भेटी देऊन सखोल तांत्रिक तपास सुरू केला. गोपनीय बातमीदार सतर्क करण्यात आले होते, तसेच सायबर सेलच्या मदतीने संशयितांच्या मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणाची (Technical Analysis) मदत घेण्यात आली. या तपासादरम्यान पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की, खटाव तालुक्यातील काही संशयित इसम या चोऱ्यांमध्ये सामील आहेत.
सापळा रचून आरोपींना ठोकल्या बेड्या मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने आरोपींच्या ठावठिकाण्यावर पाळत ठेवून, ते लपून बसलेल्या ठिकाणी अत्यंत शिताफीने सापळा रचला आणि चार मुख्य आरोपींना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे: १) सुरेश बबन जाधव (वय २३ वर्षे, रा. खटाव, जि. सातारा)
२) दत्तात्रय ऊर्फ राघू किरण मदने (वय २६ वर्षे, रा. खटाव, जि. सातारा)

३) आनंदराव ऊर्फ संजय उमाजी मदने (वय वर्षे, रा. खटाव, जि. सातारा)
४) बापूराव ऊर्फ बापू धोंडीराम मदने (वय ३३ वर्षे, रा. खटाव, जि. सातारा)

५ गुन्हे उघड, लाखोंचा मुद्देमाल जप्त अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्यांनी पुसेगाव आणि परिसरात महावितरणच्या पोलवरील तारा चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी आतापर्यंत ५ गुन्ह्यांची उकल केली असून चोऱ्यांसाठी वापरलेली वाहने, साहित्य आणि चोरलेल्या ॲल्युमिनियमच्या तारा असा एकूण ११ लाख ४३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या टोळीच्या अटकेमुळे परिसरातील महावितरणचे अधिकारी आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. पोलीस या आरोपींकडे अधिक तपास करत असून त्यांनी इतरही ठिकाणी अशा चोऱ्या केल्या आहेत का, याचा शोध पुसेगाव पोलीस घेत आहेत.




