हिंगणघाट पोलिसांची धडक कारवाई: अट्टल चेन स्नेचर जेरबंद, २.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

हिंगणघाट पोलिसांची धडक कारवाई: अट्टल चेन स्नेचर जेरबंद; २.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त, जुने गुन्हेही उघडकीस

हिंगणघाट:



हिंगणघाट शहरात मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरीने हिसकावून पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला हिंगणघाट पोलिसांनी काही दिवसांतच बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, कपडे आणि चोरी केलेले सोने असा एकूण २,६४,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हिंगणघाट येथील नेहरू वॉर्डातील रहिवासी मनोज रमेशचंद्र सिंघवी यांनी ९ ऑगस्ट २०२६ रोजी हिंगणघाट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तक्रारीनुसार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी ६:३० वाजताच्या सुमारास त्यांच्या आई श्रीमती इंदुमती सिंघवी (वय ७४ वर्ष) या कारंजा चौक ते तुकडोजी चौक रोडवर नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक करत होत्या.



त्याच वेळी पाठीमागून २५ ते ३० वर्षे वयोगटातील एक अज्ञात इसम मोटारसायकलवरून आला. त्याने तोंडाला रुमाल बांधला होता व निळसर-काळपट रंगाचा शर्ट परिधान केला होता. त्याने इंदुमती यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी (किंमत रु. ६८,०००/-) जबरीने हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला.

या तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी  अन्वये गुन्हा दाखल केला होता.



सीसीटीव्ही व गुप्त माहितीच्या आधारे कारवाई

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व ठाणेदार  अनिल राऊत यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रगटीकरण पथकाने (DB Team) तपास चक्र फिरवली.

पथकाने हिंगणघाट शहर, परिसरातील गावे आणि हायवे रोडवरील अनेक सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची बारीक पाहणी केली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदर गुन्हा जनरलसिंग उर्फ मन्नुसिंग रामसिंग टाक (वय ४० वर्ष, रा. समतानगर, नेरी दुर्गापूर, जि. चंद्रपूर) या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने केल्याची खात्री पटली.



मुद्देमाल जप्त व इतर गुन्हे उघडकीस

पुलिस पथकाने चंद्रपूर येथून संशयित आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चोरी केलेले सोने चंद्रपूर येथील एका सोनाराला विकल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी आरोपीकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

  • सोन्याची रवा (लगड): वजन १६.९४० मिग्रॅ, किंमत २,१४,४००/- रुपये

  • स्प्लेंडर मोटारसायकल (CG 07 LZ 7170): किंमत ५०,०००/- रुपये

  • गुन्ह्याच्या वेळी वापरलेले कपडे

तपासादरम्यान आरोपीने भंडारा जिल्ह्यातही अशाच प्रकारे दोन वयोवृद्ध व्यक्तींच्या गळ्यातील सोनसाखळ्या सकाळी हिसकावल्याची कबुली दिली आहे. यासंदर्भात भंडारा पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.

पोलीस पथक

ही यशस्वी कारवाई वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगणघाटचे पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या आदेशाने पार पडली.

गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार नरेंद्र डहाके, नरेंद्र आरेकर, निलेशसिंग सूर्यवंशी, सागर सांगोले, दीपक मस्के आणि अनंत हराळ यांनी ही कारवाई केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार नरेंद्र डहाके करत आहेत.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!