
चंद्रपुरात आंतरराज्यीय सराईत घरफोड्या जेरबंद; ९ गुन्हे उघड, ४.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका मोठ्या आंतरराज्यीय घरफोडीच्या आणि वाहन चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा राज्यात तब्बल ४७ गुन्ह्यांची नोंद असलेल्या एका सराईत आंतरराज्यीय गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून चंद्रपूर जिल्ह्यातील ६ पोलीस ठाण्यांतर्गत असणारे ९ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.
आरोपीचे नाव आणि पूर्वइतिहास: अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव चिन्नाबाबु व्यंकटेशवरलु गोरेला (वय ३२ वर्ष, रा. राजमहेंद्रवरम, ईस्ट गोदावरी, आंध्रप्रदेश) असे आहे. त्याला ८ जुलै २०२६ रोजी अटक करण्यात आली. या आरोपीवर यापूर्वी आंध्रप्रदेशात ४१ आणि तेलंगाणा राज्यात ६ असे एकूण ४७ घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

अशी होती चोरीची ‘मोडस ऑपरेन्डी’: हा आरोपी अत्यंत हुशारीने चोऱ्या करायचा. तो रेल्वेने प्रवास करताना कोणतेही तिकीट काढत नसे. प्रवासादरम्यान तो डोक्यावर कॅप, तोंडाला मास्क आणि पाठीवर कॉलेज बॅग बाळगायचा. रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर तो आधी परिसरातील एखादी मोटारसायकल चोरायचा. त्यानंतर त्याच चोरीच्या दुचाकीचा वापर करून आजूबाजूच्या परिसरातील बंद घरे शोधून तिथे घरफोडी करायचा. चोरी आटोपल्यानंतर ती दुचाकी पुन्हा रेल्वे स्टेशन परिसरात सोडून देऊन तो रेल्वेने आपल्या मूळ गावी पसार व्हायचा.
बल्लारपूर येथील घटनेवरून लागला शोध: १९ मे २०२६ रोजी बल्लारपूर येथील गोरक्षण वार्डात राहणाऱ्या श्रीमती रजिता परमेश्वर सिंघाराव यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोराने घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण २,९२,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कांकेडवार, बलराम झाडोकार आणि त्यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. या तपासात तेलंगाणाचे पोलीस अंमलदार नरेश दत्त यांनी आरोपीची ओळख पटवण्यास मोलाची मदत केली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आंध्रप्रदेशातील राजमुंद्री येथून आरोपीला ताब्यात घेतले.
४,६५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त: पोलीस कारवाईत आरोपीकडून एकूण ४ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, ज्यामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे:

-
१ हिरो होंडा पॅशन प्रो मोटारसायकल (किंमत रु. ४०,०००/-)
-
१ हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (किंमत रु. ३०,०००/-)

-
१ डेस्टिनी मोपेड स्कुटी (किंमत रु. ५०,०००/-)
-
सोन्याचे दागिने (किंमत रु. ३,२०,०००/-) — हे दागिने आरोपीने राजमुंद्री येथील गोल्ड कंपनीत विकले असून, ते हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
-
चांदीचे दागिने (किंमत रु. २५,०००/-)
एकूण ९ गुन्हे उघडकीस: या अटकेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत असणारे खालील ९ गुन्हे उघड झाले आहेत.
१) पोलीस ठाणे बल्लारपूर – ३ गुन्हे (घरफोडी व चोरी)
२) पोलीस ठाणे राजुरा – ४ गुन्हे (घरफोडी व चोरी)
३) पोलीस ठाणे चंद्रपूर शहर – १ गुन्हा
४) पोलीस ठाणे रामनगर – १ गुन्हा
सदर आरोपीला पुढील तपासासाठी बल्लारपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्याच्याकडून आणखीही काही मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.




