
भिवापूर पोलिसांची मोठी कारवाई: २ गोवंश जनावरांची कत्तलखान्याकडे जाणारी अवैध वाहतूक उघडकीस; ४.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त
नागपूर / भिवापूर: कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची बेकायदेशीर व अत्यंत क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या तस्करांवर भिवापूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २ गोवंश जनावरांची सुटका केली असून, घटनास्थळावरून एक वाहन आणि जनावरे असा एकूण ₹ ४,८२,०००/- चा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे एमआयडीसी टी पॉईंटवर नाकाबंदी २ सप्टेंबर २०२६ रोजी भिवापूर पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते. दरम्यान, ‘भिवापूर – उमरेड’ मुख्य रस्त्यावरून एका वाहनातून गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याची पक्की माहिती गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ भिवापूर एमआयडीसी टी पॉईंटवर सापळा रचून नाकाबंदी केली.

अंधाराचा फायदा घेऊन चालक पसार नाकाबंदीदरम्यान संशयित ‘टाटा एस’ चारचाकी वाहन (क्रमांक MH-04/HD-1927) भरधाव वेगाने येताना दिसले. पोलिसांनी वाहनाला थांबण्याचा इशारा केला, मात्र चालकाने गाडी काही अंतरावर उभी केली आणि पोलिसांना बघून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
जनावरांची अत्यंत हाल अपेष्टेत वाहतूक पोलिसांनी पळून गेलेल्या वाहनाची पंचांसमक्ष तपासणी केली असता, त्यात २ गोवंश जनावरे आढळून आली. वाहनात जनावरांसाठी कोणतीही चारा-पाण्याची सोय नव्हती. अतिशय कमी जागेत दाटीवाटीने कोंबून, शिंगे व पाय आखूड दोरखंडाने बांधून अत्यंत क्रूर वातावरणात त्यांची वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले.

४.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त व गुन्हा दाखल घटनास्थळावरून पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला:
-
टाटा एस चारचाकी वाहन (MH-04/HD-1927): किंमत ₹ ४,५०,०००/-

-
०२ गोवंश जनावरे: किंमत ₹ ३२,०००/-
-
एकूण जप्त मुद्देमाल: ₹ ४,८२,०००/-

पळून गेलेल्या अज्ञात वाहचालकाविरुद्ध भिवापूर पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० च्या विविध कलमांसह गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फरार चालकाचा शोध भिवापूर पोलीस घेत आहेत.




