
अवघ्या ४ तासांत खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा – स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणची दमदार कारवाई
अमरावती: पोलीस स्टेशन खल्लार हद्दीतील ग्राम मालवाडा (नालवाडा) येथे १० ऑक्टोबर २०२६ रोजी घडलेल्या एका सनसनाटी खून प्रकरणाचा अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवघ्या चार तासांच्या आत यशस्वी उलगडा केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि खल्लार पोलिसांनी संयुक्तपणे ही धडाकेबाज कामगिरी केली आहे.
घटनेचा संक्षिप्त घटनाक्रम
-
तारीख व वेळ: १० ऑक्टोबर २०२६.

-
घटनास्थळ: ग्राम मालवाडा (नालवाडा), ता. दर्यापूर, जि. अमरावती (पोलीस स्टेशन खल्लार हद्द).
-
मयत व्यक्ती: दीपक आत्माराम उमरेकर (वय ४५ वर्षे, रा. मालवाडा/नालवाडा).

-
घटनेचे स्वरूप: मृतकाच्या राहत्या घरी अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला होता. घटनास्थळावर रक्ताचे डाग आढळून आले होते.
तपासाची चक्र वेगाने फिरली
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा आणि खल्लार पोलीस स्टेशनच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, हा खून मृतकाच्या शेजारी राहणाऱ्या युवकाने केल्याचे निष्पन्न झाले. माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्यास वलगाव येथून ताब्यात घेतले.

-
पकडलेल्या आरोपीचे नाव: सुमित हिलाल ऊर्फ हरीश भांडगे (वय १९ वर्षे, रा. नालवाडा, ता. दर्यापूर, जि. अमरावती).
जुन्या वादातून संपवलेस आयुष्य
पोलिसांनी वलगाव येथून ताब्यात घेतल्यानंतर आरोपीची कसून चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. मृतक दीपक उमरेकर यांच्यासोबत त्याचे पूर्वीपासून वाद सुरू होते. याच जुन्या वादाच्या राग मनात धरून, १० ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे २:०० वाजण्याच्या सुमारास आरोपी सुमित याने त्याच्या मावसभावाच्या सोबतीने मृतकाच्या घरात प्रवेश केला आणि पोटावर चाकूने सपासप वार करून त्यांचा खून केला.

पोलीस पथकाचे यश
सदर लक्षणीय आणि वेगाने केलेली कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम (भा.पो.से.) आणि अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, खल्लारचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मुडे, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गुर्जर, पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, सतीश झाल्टे, पवार आणि पोलीस अंमलदार मंगेश लकडे, सचिन मसांगे, सागर धापड, अजय डहाके, विजय निमखडे, हर्षल काळे, प्रताप दिवेकर व प्रज्वल राऊत यांनी सहभाग घेतला.
आरोपीस अटक करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी खल्लार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.




