
हिंगणघाट येथे ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या चोरणारा चोरटा गजाआड; गुन्हे प्रकटीकरण (DB) पथकाची धडक कारवाई, ७१ हजारांचा माल जप्त
हिंगणघाट: येथील पोलीस स्टेशन अंतर्गत घरासमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या एका अट्टल चोरट्याला हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण (DB) पथकाने तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे अत्यंत शिताफीने अटक केली आहे. आरोपीकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या ३ बॅटऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेली एक होंडा अॅक्टिव्हा दुचाकी, असा एकूण ७१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही संपूर्ण यशस्वी कामगिरी वर्ध्याचे माननीय पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट येथील रहिवासी फिर्यादी श्री. इंद्रजीत हरीनारायण शाहू (वय ४७ वर्षे) यांनी हिंगणघाट पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दिली होती. त्यांच्या घरासमोर ठेवलेल्या ट्रॅक्टरची बॅटरी, तसेच त्यांच्याच वार्डातील रहिवासी जगदीश कांबळे आणि सतीश वरटकर यांच्याही ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्या होत्या. या तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी ११ जुलै २०२६ रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक १०९२/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा नोंदवला.

पोलिसांची तातडीने चक्र फिरली: गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण (DB) पथक आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरात रवाना झाले. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता, सदरची चोरी स्विपर कॉलनी, हिंगणघाट येथील रहिवासी अंकित मोगरे याने केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
चोरीची दिली कबुली, मुद्देमाल जप्त: मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी संशयित आरोपी अंकित मोगरे याला ताब्यात घेतले. पोलीस खाक्या दाखवून गुन्ह्यातील बॅटऱ्यांबाबत सखोल विचारपूस केली असता, त्याने ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपनीच्या ३ ट्रॅक्टर बॅटऱ्या (किंमत प्रत्येकी ७,००० रुपयांप्रमाणे एकूण २१,००० रुपये) आणि चोरीसाठी वापरलेली एक विना क्रमांकाची होंडा अॅक्टिव्हा मोपेड गाडी (किंमत ५०,००० रुपये), असा एकूण ७१,००० रुपये किमतीचा माल जप्त केला.

यांनी केली कारवाई: हिंगणघाटचे पोलीस निरीक्षक अनिल राऊत व सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल स्थूल यांच्या आदेशान्वये करण्यात आली. कारवाईत डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पोलीस नाईक राजेश शेंडे, पोलीस शिपाई आशिष नेवारे, मंगेश वाघमारे आणि रोहित साठे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.






