
परभणीत दुचाकी चोरणारी तिघांची टोळी जेरबंद; चार गुन्हे उघडकीस, चार मोटार सायकली जप्त

परभणी (प्रतिनिधी):
जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी परभणी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत अवघ्या १८ वर्षे वयाच्या तीन तरुणांच्या टोळीला जेरबंद केले आहे. या कारवाईत परभणीसह बीड जिल्ह्यातील परळी येथील एकूण चार दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी चोरीला गेलेल्या चारही मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आज (दि. २६ नोव्हेंबर २०२६) जिल्ह्यात पेट्रोलिंग करत असताना त्यांना एका गोपनीय खबऱ्यामार्फत दुचाकी चोरांबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून परभणी शहरातील तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यामध्ये शेख इरफान शेख शरीफ (वय १८, रा. वांगी रोड, साईबाबा नगर, परभणी), शेख अरबाज शेख मोहम्मद (वय १८, रा. साईबाबा/करीम नगर, मशिदीजवळ, परभणी) आणि तहा अब्दुल हक शेख (वय १८, रा. मदिना पाटी, आनंद नगर, धार रोड, परभणी) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्यांनी ताडकळस, पूर्णा आणि बीड जिल्ह्यातील परळी परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्या माहितीवरून पोलिसांनी खालील चार गुन्हे उघडकीस आणले आहेत:

-
ताडकळस पोलीस ठाणे: गु.र.नं. ३०६/२६ व १७४/२६ (कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता – BNS)
-
पूर्णा पोलीस ठाणे: गु.र.नं. २८३/२६ (कलम ३०३(२) BNS)

-
परळी शहर पोलीस ठाणे (जि. बीड): गु.र.नं. २५९/२६ (कलम ३०३(२) BNS)
या प्रकरणी पोलिसांनी सविस्तर जप्ती पंचनामा करून चोरीला गेलेल्या एकूण चार मोटार सायकली जप्त केल्या आहेत. पुढील कायदेशीर कारवाईसाठी तिन्ही आरोपींना ताडकळस पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

या पथकाने केली कारवाई:
ही संपूर्ण कामगिरी परभणीचे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, मानवत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे, स्थागुशाचे पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, GPSI मधुकर चट्टे, तसेच पोलीस अंमलदार निलेश भुजबळ, सुग्रीव केंद्रे, पोह उमर (मानवत), माणिक डुकरे, सूर्यकांत फड, विष्णू चव्हाण, विलास बहुरे आणि बाळासाहेब सपकाळ यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.


