
वर्धा पोलिसांची सतर्कता: घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराला अटक
वर्धा: वर्धा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी वर्धा जिल्ह्यात नियमित रात्र गस्त आणि वाहन पेट्रोलिंग सुरू आहे.
संशयास्पद हालचालींवरून अटक:-

दिनांक १८ आणि १९ जुलै २०२६ च्या मध्यरात्री, वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव परिसरात पोलीस पथक पेट्रोलिंग करत होते. यावेळी एक व्यक्ती चोरी किंवा घरफोडी करण्याच्या उद्देशाने स्वतःची ओळख लपवून संशयास्पदरीत्या वावरताना आढळली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याचे नाव सोनू उर्फ चड्डा भुताजी दहिवडे (वय २४ वर्षे, रा. दुर्गापूर, जि. चंद्रपूर) असल्याचे समोर आले.
इतर जिल्ह्यांतील गुन्ह्यांची कबुली:-

पोलीस उपनिरीक्षक गारगोटे मॅडम आणि डी.बी. (गुन्हे शोध) पथकाने या आरोपीची सखोल चौकशी केली. तपासादरम्यान, हा आरोपी वणी (जि. यवतमाळ) येथील घरफोडीच्या गुन्ह्यात आणि राजुरा (जि. चंद्रपूर) येथील चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असून तो फरार होता, अशी माहिती निष्पन्न झाली. यानंतर वर्धा पोलिसांनी तातडीने राजुरा पोलीस पथकाशी संपर्क साधला आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला त्यांच्या ताब्यात दिले.
मोठा अनर्थ टळला:-

प्राथमिक तपासात हा सराईत गुन्हेगार वर्धा शहरात चोरी करण्याच्याच उद्देशाने आल्याचे समोर आले आहे. वर्धा शहर हद्दीत त्याने यापूर्वी गुन्हे केले नसल्याचे सांगितले असले, तरी पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत. वर्धा पोलिसांच्या सतर्कतेमुळे शहरात घडणारा एक मोठा गुन्हा टळला आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक:-

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गीतांजली गारगोटे, शशिकांत मुंडे, पोलीस अंमलदार योगेश ब्राम्हण आणि महेंद्र पाटील यांच्या डी.बी. पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
नागरिकांना आवाहन:-
वर्धा जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा आपत्कालीन क्रमांक ११२ वर माहिती द्यावी.




