
गोव्यातून १२ सायबर गुन्हेगार गजाआड; अमरावती ग्रामीण पोलिसांची कोट्यवधींच्या बँक खाते घोटाळ्यावर मोठी कारवाई!
अमरावती ग्रामीण सायबर पोलीस कारवाई: कोट्यवधींचा घोटाळा उघड, गोव्यातून १२ आरोपींना अटक
अमरावती ग्रामीण पोलिसांनी एका मोठ्या आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश केला आहे. गरीब आणि मजूर वर्गाच्या बँक खात्यांचा गैरवापर करून ऑनलाईन गेमिंग व सायबर फसवणुकीसाठी कोट्यवधी रुपयांचे बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्या १२ आरोपींना पोलिसांनी थेट गोवा येथून अटक केली आहे.सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलिस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्ह्याची पद्धत
ही टोळी अमरावती जिल्ह्यातील गरीब आणि मजूर लोकांच्या हलाखीच्या परिस्थितीचा फायदा घेत असे. त्यांना किरकोळ पैशांचे आमिष दाखवून, सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने बँकांमध्ये खाती उघडण्यास सांगत. त्यानंतर, त्यांचे बँक पासबुक, एटीएम (ATM) कार्ड, आणि खात्याशी लिंक असलेले सिमकार्ड स्वतःकडे जमा करून घेत. या खात्यांचा वापर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनाधिकृत ऑनलाईन गेमिंग आणि सायबर फसवणुकीचे कोट्यवधींचे व्यवहार करण्यासाठी केला जात होता.

पोलीस कारवाई आणि अटक
अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. निकेतन कदम यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, शिरखेड पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३१६ (२), ३१८ (४) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ३ पथके तयार केली. एका पथकाने दक्षिण गोव्यातील ‘प्रोव्हीडंट अडोरा सोसायटी’ या उच्चभ्रू वस्तीत छापा टाकून खालील आरोपींना अटक केली: १. देवचंद बंडूजी मेश्राम (वय २६, रा. अमरावती) २. प्रेम दिलीप खिलारे (वय २१, रा. हिंगोली / मुंबई) ३. अनिकेत सुरेश मस्के (वय २४, रा. अचलपूर, अमरावती) ४. योगेश भिमरावजी ईरपाते (वय ३१, रा. तिवसा, अमरावती) ५. प्रितम ज्ञानेश्वर इंगळे (वय २२, रा. मोर्शी, अमरावती) ६. आशिषकुमार उमाशंकर चौरसिया (वय २५, रा. उत्तर प्रदेश) ७. सत्यम गयाप्रसाद मौर्या (वय २२, रा. उत्तर प्रदेश) ८. शुभम गयाप्रसाद झारीया (वय ३०, रा. मध्य प्रदेश) ९. वैभव कामराज सुर्यवंशी (वय २४, रा. मध्य प्रदेश) १०. आदित्य युवराज माळी (वय २७, रा. मध्य प्रदेश) ११. सुशिल इंदल बर्मन (वय २८, रा. मध्य प्रदेश) १२. एक महिला आरोपी

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
आरोपींकडून एकूण १०,८५,००० रुपये किमतीचा खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे:
-
विविध बँकांचे पासबुक: ६४

-
एटीएम (ATM) कार्ड: १४७
-
चेकबुक: १९

-
सिमकार्ड (SIM Cards): १९८
-
मोबाईल हँडसेट: ५२
-
लॅपटॉप: ०९
-
टॅबलेट: ०३
तपासातील महत्त्वाचे खुलासे
-
आतापर्यंतच्या तपासात या खात्यांमधून तब्बल ६,२५,००,००० रुपये (६ कोटी २५ लाख) चे आर्थिक व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे.
-
तपासात निष्पन्न झालेली सर्व ६४ बँक खाती गोठवण्यात (Freeze) आली आहेत.
-
या बँक खात्यांचा वापर करून इतर राज्यांमध्येही सायबर गुन्हे घडल्याच्या ऑनलाईन तक्रारी नोंदवलेल्या आहेत.
सर्वसामान्य जनतेला पोलिसांचे आवाहन
पोलीस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे: १. केवळ किरकोळ पैशांच्या प्रलोभनाला बळी पडून स्वतःच्या नावावर बँक खाते, एटीएम कार्ड किंवा सिमकार्ड काढून इतरांना देऊ नका, तसेच कोणालाही आपला OTP सांगू नका. या खात्यांचा वापर ऑनलाईन गेमिंग, शेअर मार्केट ट्रेडींग आणि ‘डिजिटल अरेस्ट’ सारख्या गंभीर सायबर गुन्ह्यांसाठी केला जातो. २. जर अमरावती ग्रामीण किंवा इतर भागातील कोणत्याही नागरिकाने आपले बँक खाते दुसऱ्याला वापरण्यास दिले असेल, तर ते ताबडतोब परत घ्यावे आणि सायबर पोलीस अमरावती ग्रामीणच्या हेल्पलाईन क्रमांक ७०३०००६८१९ वर माहिती द्यावी.
मार्गदर्शन व कामगिरी: सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे, स.पो.नि. विलासकुमार सानप आणि सायबर पोलीस अंमलदारांच्या पथकाने केली आहे.




