मेहकर पोलिसांची मोठी कामगिरी: मोक्का मधील अट्टल गुन्हेगारासह दोघे जेरबंद, धारदार शस्त्रास्त्रांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

बुलढाणा (मेहकर): बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पोलीस स्टेशनच्या पथकाने ६ जुलै २०२६ रोजी एका गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली आहे. मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई असलेला एक कुख्यात अट्टल गुन्हेगार आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी सिनेमॅटिक स्टाईलने पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत.सदर धडक कामगिरी बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी (मेहकर)  संतोष खाडे आणि सोहन माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईचा सविस्तर तपशील: ६ जुलै २०२६ रोजी मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांना अत्यंत गोपनीय माहिती मिळाली. रिसोड-सोनाटी रस्त्यावरून मेहकर बायपास मार्गे मेहकर शहराकडे एक लाल रंगाची डॅट्सन रेडी गो (Datsun Redi-Go) कार (क्रमांक MH-31-FA-5820) येत असून, तिच्या मागच्या काचेवर ‘जगदंब’ असे लिहिलेले आहे. या वाहनात काही अट्टल आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रवास करत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती.



माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आलेवार यांनी आपल्या पथकासह आणि दोन पंचांसह तात्काळ माहिती मिळालेल्या ठिकाणी सापळा रचला. काही वेळातच संशयित लाल रंगाची कार येताना दिसली. पोलिसांनी हात दाखवून ती थांबवण्याचा इशारा केला, मात्र चालकाने गाडी न थांबवता बायपासने सारंगपूर बरटाळा फाट्याकडे भरधाव वेगाने पळवली. पोलिसांनी तात्काळ शासकीय जीपने या कारचा थरारक पाठलाग सुरू केला आणि मेहकर तालुक्यातील गणपूर शिवारातील गणपूर फाट्यावर गाडीला शिताफीने अडवले.

गाडी थांबताच त्यातील तीन इसमांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला, तर दोघांना पोलिसांनी पाठलाग करून जागीच पकडले.



पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे: १) अमोल परात्या भोसले (वय २५ वर्षे, रा. बरटाळा, ता. मेहकर, जि. बुलढाणा) २) अजय दहीमल भोसले (वय २६ वर्षे, रा. वरदडा – लोणी लव्हाळा, ता. मेहकर, जि. बुलढाणा)

मोठा मुद्देमाल आणि घातक शस्त्रे जप्त: पकडलेल्या आरोपींची आणि वाहनाची पंचांसमक्ष झडती घेतली असता, त्यांच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:



  • १८.५ इंच लांबीचा लाकडी मूठ असलेला एक जुना, धारदार व टोकदार सुरा.

  • ‘COLUMBIA’ कंपनीचा कापडी काळ्या कव्हरमधील १३ इंच लांबीचा चाकू.



  • १० इंच लांबीची एक जुनी धारदार सुरी.

  • १० इंच लांबीचा एक सिल्वर रंगाचा ऑटोमॅटिक चाकू.

  • एक रेडमी नोट १३ ५G (Redmi Note 13 5G) मोबाईल फोन.

  • लाल रंगाची डॅट्सन रेडी गो कार (MH-31-FA-5820).

  • एकूण जप्त मुद्देमाल: रु. २,६६,८५०/- (दोन लाख सहासष्ट हजार आठशे पन्नास रुपये).

फरार आरोपीसाठी कॉम्बिंग ऑपरेशन आणि गुन्ह्यांचा आलेख: पळून गेलेल्या तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी प्रतापूर, उकळी आणि सुकळी या गावांमध्ये तात्काळ ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ राबवले.

पकडण्यात आलेला मुख्य आरोपी अमोल परात्या भोसले हा कुख्यात गुंड असून, त्याच्याविरुद्ध बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर विविध पोलीस ठाण्यांमध्ये शरीर आणि मालमत्तेविरुद्धचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची नोंद खालीलप्रमाणे आहे: १) पो.स्टे. मेहकर – आर्म ॲक्ट (कलम ४/२५, ३/२५) २) पो.स्टे. मेहकर – भा.दं.वि. कलम ३०७ (हाफ मर्डर) ३) पो.स्टे. खामगाव ग्रामीण – भा.दं.वि. कलम ३९५, ३९७ (दरोडा) ४) पो.स्टे. लोहा (जि. नांदेड) – भा.दं.वि. कलम ३०९ ५) पो.स्टे. अहमदपूर (जि. लातूर) – BNS कलम ३०९(६), ३११, १०३(१), १०९, ३(५) ६) पो.स्टे. रिसोड (जि. वाशीम) – विविध गुन्ह्यांतर्गत BNS कलमे ३०५(अ), ३३१(४) इत्यादी

आरोपींकडून विनापरवाना अवैध धारदार शस्त्रे बाळगल्याप्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४५७/२०२६ नुसार भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४/२५ सह कलम १३५ म.पो.का. अन्वये नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान त्यांच्याकडून आणखीही काही गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

मार्गदर्शन व पोलीस पथक:पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, सपोनि. संदीप बिरांजे, सपोनि. प्रदीपकुमार राठोड, पोउपनि. किरण खाडे, एएसआय सुखदेव गव्हाणे आणि पोलीस अंमलदार मोहम्मद परसुवाले, अवचार, करीम शहा, अमोल बोर्डे, समाधान अरमाळ, गणेश वैद्य, संदीप भोंडाणे व संजय पहारे यांच्या पथकाने बजावली आहे. 







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!