अमरावती शहर पोलिसांची मोठी कारवाई; चाकू हल्ल्यातील दोन आरोपी अटकेत, एक जण फायरिंग प्रकरणातील फरार गुन्हेगार

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती शहर  पोलिसांची मोठी कारवाई; नागपुरी गेट हद्दीतील फायरिंग प्रकरणातील फरार आरोपीसह दोघांना गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

अमरावती: शहरातील नवसारी चौक भागात झालेल्या एका चाकू हल्ला प्रकरणात अमरावती शहर गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत दोन आरोपींना काही तासांतच अटक केली आहे. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी हा यापूर्वी नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत २० जून २०२६ रोजी झालेल्या बहुचर्चित फायरिंगच्या  गुन्ह्यातील फरार आरोपी आहे. सदर धडक कारवाई पोलीस आयुक्त  राकेश ओला , पोलीस उपआयुक्त  यशवंत सोळंके , पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) श्रीमती प्रांजली सोनावणे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे विभाग) कैलास पुंडकर आणि सहायक पोलीस आयुक्त  निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितेश रमेशराव तायवाडे (वय ४५ वर्षे, रा. रतनगंज, तिसरा नागोबा ओटा, अमरावती) यांचे नवसारी चौक येथे ‘MP राजस्थान’ नावाचे ट्रान्सपोर्टचे दुकान आहे. ११ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास तायवाडे हे नवसारी चौकातील आप्पाच्या कॅन्टीनवर चहा पिण्यासाठी गेले होते. तिथे आलेल्या दोन इसमांनी त्यांच्याशी विनाकारण वाद घातला आणि तेथून निघून गेले.

काही वेळाने हे दोघे पुन्हा तिथे आले आणि त्यांनी तायवाडे यांना शिवीगाळ करत मारहाण व धक्काबुक्की सुरू केली. तायवाडे स्वतःचा बचाव करत असतानाच, एका आरोपीने त्याच्या जवळील धारदार शस्त्राने तायवाडे यांच्या कमरेच्या खाली वार करून त्यांना गंभीर जखमी केले व दोघेही घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेबाबत गाडगेनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ७४८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता  अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.



फायरिंग प्रकरणातील फरार आरोपी निष्पन्न: या गंभीर घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा, अमरावती शहरचे अधिकारी आणि अंमलदार यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. तपास करत आरोपींची नावे व पत्ते शोधून काढले असता, यातील एक आरोपी हा पो.स्टे. नागपुरी गेट येथील अपराध क्रमांक ३२३/२०२६ मधील गोळीबार प्रकरणातील मुख्य फरार आरोपी असल्याचे समोर आले. त्याच्यावर नागपुरी गेट पोलीस ठाण्यात कलम बी.एन.एस. सहकलम ३, ४, २५ आर्म अॅक्ट आणि इतर कलमांन्वये गुन्हा दाखल होता व पोलीस त्याचा शोध घेत होते.

अशी झाली अटक: आरोपींना तात्काळ जेरबंद करण्यासाठी गुन्हे शाखेने आपल्या गुप्त बातमीदारांना सक्रिय केले. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून आणि आरोपींचा थरारक पाठलाग करून घटनेच्या अवघ्या काही तासांतच दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींना गाडगेनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.



अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:

१) सैयद सोहेल उर्फ फज्जू सैयद गफार (वय २८ वर्षे, रा. पाण्याची टाकीजवळ, अन्सार नगर, अमरावती)



२) अब्दुल जरिब उर्फ शाहरुख अब्दुल शरीफ (वय ३२ वर्षे, रा. रतनगंज, गवळीपूरा, अमरावती)

यांनी केली कारवाई:

या कामगिरीत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे, सपोनि मनीष वाकोडे, सपोनि दशरथ आडे, सहा. पोउपनि फिरोज खान, संभाजी केन्द्रे, पोहवा मंगेश लोखंडे, पो. हवा. नाझिमोद्दीन सैयद, पो. ना. सचिन भोयर, पोलीस अमलदार रंजित गावंडे, सागर ठाकरे, निखील गेडाम, सूरज चव्हाण आणि चालक चेतन शर्मा, प्रभात पोकळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!