
वर्धा शहरात देहव्यापार अड्ड्यांवर पोलिसांचा मोठा छापा; ७ आरोपी अटकेत, ४ पीडित महिलांची सुटका
वर्धा: वर्धा शहरातील वेगवेगळ्या भागात चालणाऱ्या देहव्यापार अड्ड्यांवर ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष’ आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ७ आरोपींना ताब्यात घेतले असून, ४ पीडित महिलांची सुटका केली आहे. तसेच आरोपींच्या ताब्यातून एकूण १,२५,५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे ‘मंगलम लॉज’वर धाड १० जुलै २०२६ रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, पवनार येथील ‘मंगलम लॉज’चा मॅनेजर मुरली नावाचा इसम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुलींना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करतो आणि लॉजवर ग्राहक पुरवतो. वर्ध्याचे पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या सूचनेवरून पोलिसांनी अत्यंत गोपनीयता बाळगून बनावट ग्राहक (पंटर) तयार करून पवनार परिसरातील मंगलम लॉजवर छापा टाकला.

या छाप्यात लॉजचा मॅनेजर मुरली पुंडलीकराव पुसतोडे (वय २४, रा. चंद्रपूर, ह.मु. पवनार) आणि लॉज व्यावसायिक सुमीत गणेश सोदिया (वय २६, रा. वर्धा) हे दोघे रंगेहात मिळून आले. तेथे एक पीडित महिला देखील आढळून आली, जिची पोलिसांनी सुटका केली. आरोपींकडून ३ अँड्रॉइड मोबाईल, ४,८७० रुपये रोख आणि देहव्यापाराचे साहित्य असा एकूण ३४,८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सेवाग्राम पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १४३(२) आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील इतर ३ ठिकाणीही कारवाई या कारवाईसोबतच पोलिसांनी वर्धा शहरातील इतर तीन प्रमुख ठिकाणीही छापे टाकले:

१) कृष्णाई कोर्ट बिल्डिंग टी-पॉइंट, सावंगी (मेघे)
२) नखाते लेआउट, वैष्णवी कॉम्प्लेक्सजवळ, कारला रोड

३) पवन लॉज, मेन रोड, भामटीपुरा
या सर्व ठिकाणी मिळून पोलिसांनी एकूण ७ आरोपींवर कारवाई केली असून सुटका केलेल्या ४ पीडित महिलांची रवानगी ‘महिला सुधारगृह, वर्धा’ येथे करण्यात आली आहे.

या पथकाने केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सह. पोलीस निरीक्षक माधुरी वाघाडे, पोलीस उपनिरीक्षक गीतांजली गारगोटे, दिशा ताजने तसेच पोलीस अंमलदार दिवकर परीमळ, अमर लाखे, संजयसिंग सूर्यवंशी, चंद्रकांत बुरंगे यांच्यासह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाचा समावेश होता.
पोलीस अधीक्षकांचे जनतेला आवाहन पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी वर्धा जिल्ह्यातील जनतेला आवाहन केले आहे की, आपल्या आजूबाजूच्या परिसरात अशा प्रकारे बेकायदेशीर देहव्यापार किंवा इतर अवैध व्यवसाय चालत असल्यास, त्याची माहिती तात्काळ वर्धा जिल्हा पोलीस विभागाला द्यावी.




