
३१ वर्षांपासून पसार असलेला आरोपी अखेर जाळ्यात; वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी

हिंगणघाट (वर्धा) :

पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील तब्बल ३१ वर्षांपासून फरार (पसार) असलेल्या पाहिजे असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा (LCB) वर्धाच्या पथकाने मोठ्या चलाखीने जेरबंद केले आहे. दिलीप नथुजी ढोरे (वय ५४ वर्ष, रा. साखरा (कोलगाव), ता. वनी, जि. यवतमाळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो गेल्या तीन दशकांहून अधिक काळ पोलिसांना गुंगारा देत होता.

गुन्ह्याची पार्श्वभूमी:
पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे वर्ष १९९५ मध्ये (घरफोडी व चोरी) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी दिलीप ढोरे हा घटनेपासून म्हणजेच मागील ३१ वर्षांपासून सतत फरार होता.
अशी केली कारवाई:
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हिंगणघाट परिसरामध्ये समांतर तपास करत असताना, या जुन्या आणि पसार आरोपीबाबत पोलिसांना कोणतीही ठोस माहिती किंवा सुगावा नव्हता. मात्र, पथकाने कौशल्यपूर्ण व तांत्रिक तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा शोध सुरू केला.

तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी हा यवतमाळ जिल्ह्यातील वनी तालुक्यातील साखरा (कोलगाव) येथे वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीची खात्री पटताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ वनी येथील साखरा (कोलगाव) येथे रवाना झाले. तेथे सापळा रचून आरोपी दिलीप नथुजी ढोरे यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
आरोपीस ताब्यात घेतल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांना तात्काळ देण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यास पोलीस स्टेशन हिंगणघाट यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले आहे.

पोलीस पथकाचे यशस्वी नेतृत्व व सहभाग:
सदर यशस्वी आणि कौतुकास्पद कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या धडक कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उपनि. विजयसिंग गोमलाडू, पोलीस अंमलदार मनोज धात्रक, महादेव सानप, हर्षल सोनटक्के, अभिषेक नाईक (सर्व स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा) तसेच सायबर सेलचे अक्षय राऊत यांनी सहभाग घेऊन महत्त्वाची भूमिका बजावली.





