
अमरावती ग्रामीण: अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांची मोठी कारवाई; हायवा ट्रक व ट्रॅक्टरसह ४५.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त
अमरावती: अमरावती ग्रामीण जिल्ह्यामध्ये अवैध आणि विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलीस पथकाने दोन हायवा ट्रक आणि एक ट्रॅक्टरसह एकूण ४५ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एकूण ८ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सदरची धडक कारवाई अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम (भापोसे) यांच्या आदेशाने आणि अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरून कारवाई अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी जिल्ह्यातील अवैध रेती उपसा आणि विनापरवाना वाहतुकीविरुद्ध कडक पावले उचलण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना दिले होते. या सूचनेनुसार एलसीबीचे पथक वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली.

१) परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील कारवाई: दिनांक ५ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान कैकाडी पुरा रोड, अग्रसेन भवन समोर एक ट्रॅक्टर अवैध रेती वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून या ठिकाणी ‘फार्मट्रॅक ४५’ कंपनीचा ट्रॅक्टर (क्र. एम एच २७ एल ६८५७) आणि विना क्रमांकाची ट्रॉली पकडली. यामध्ये अंदाजे १ ब्रास रेती मिळून आली. पोलिसांनी ५ लाख रुपयांचा ट्रॅक्टर आणि ७ हजार रुपयांची रेती, असा एकूण ५,०७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
-
आरोपी: अरविंद गंगाराम मावसकर (वय २८, रा. गौलखेडा बाजार, परतवाडा) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याचा साथीदार गोलू खान समशेर खान (रा. देशमुख प्लॉट, परतवाडा) हा फरार झाला आहे.

२) शेघाट (शेंदूरजना घाट) पोलीस स्टेशन हद्दीतील पहिली कारवाई: शेघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुसला टोल प्लाझा येथे पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एक टाटा कंपनीचा हायवा ट्रक अडवला. या हायवा ट्रकमध्ये विनापरवाना अंदाजे ५ ब्रास रेती आढळून आली. पोलिसांनी २० लाख रुपयांचा हायवा आणि ४० हजार रुपयांची रेती, असा एकूण २०,४०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
-
आरोपी: देवीदास गुलाबराव मरसकोल्हे (वय ३८), तुषार प्रकाश टेकाम (वय २०) आणि दीपक काळे (सर्व राहणार पुसला) यांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले.

३) शेघाट पोलीस स्टेशन हद्दीतील दुसरी कारवाई: पुसला टोल प्लाझावरच पोलिसांनी आणखी एका टाटा कंपनीच्या हायवा ट्रकवर कारवाई केली. याही ट्रकमध्ये विनापरवाना ५ ब्रास रेती चोरटी वाहतूक केली जात होती. पोलिसांनी २० लाख रुपयांचा हायवा ट्रक आणि ४० हजार रुपयांची रेती, असा एकूण २०,४०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
-
आरोपी: गणेश रमेश कोकोडे (वय ३८), प्रशांत सूर्यभान कुमरे (वय १९) आणि धनराज नथीले (सर्व राहणार पुसला) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

एकूण ४५.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेने या वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण ४५,८७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी हा मुद्देमाल संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे आणि आरोपींवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
कारवाई करणारे पोलीस पथक:
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, पोलीस अंमलदार बळवंत दाभणे, रविंद्र बावणे, भूषण पेठे, निलेश डांगोरे, पंकज फाटे आणि चालक प्रशिक वानखडे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.




