
मानकापूर पोलिसांची मोठी कारवाई: ६.६४ लाखांची घरफोडी करणाऱ्या मध्य प्रदेशातील चोरट्याला अटक
नागपूर:
नागपुरातील मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. बंद घराची खिडकी तोडून तब्बल ६ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या अट्टल चोरट्याला पोलिसांनी मध्य प्रदेशातून मुसक्या आवळून अटक केली आहे.

घटनेचा पार्श्वभूमी व तपशील:
दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९:३० ते १०:१५ च्या सुमारास, मानकापूर हद्दीतील प्लॉट नं. १६८, बाबा बगदादीया नगर येथील रहिवासी फिर्यादी सय्यद मुजफ्फर अली मीर साबीर अली (वय ४२ वर्ष) हे आपल्या कुटुंबासह पार्सल आणण्यासाठी बाहेर गेले होते. घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोराने घराची स्लायडिंग खिडकी तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील अलमारीतून ६०,००० रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण ₹६,६४,०००/- रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास आणि थरारक कारवाई:
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मानकापूर पोलिसांनी तत्काळ तांत्रिक तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित आरोपी ऑटोने ऑटोमोटीव्ह चौक आणि तेथून खाजगी बसने मध्य प्रदेशातील शिवनी येथे पसार झाल्याचे समोर आले.

पोलिसांचे एक विशेष पथक तातडीने मध्य प्रदेशला रवाना झाले. शिवनी परिसरात सलग ३ दिवस मुक्काम ठोकून, गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला जाळ्यात ओढले.
आरोपी व जप्त मुद्देमाल:

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दीपक अतारसिंग झारीया (वय २७ वर्ष, रा. बिनेकी, मुंडा, जि. शिवनी, मध्य प्रदेश) असे आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचे दागिने व सोन्याची लगड असा एकूण ₹५,७०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्ह्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत:
तपासात आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याची घरफोडी करण्याची पद्धत समोर आली आहे. आरोपी चोरी करण्यापूर्वी परिसराची रेकी करायचा. ज्या भागात बांधकाम सुरू असणाऱ्या २-३ मजली इमारती आहेत, त्या इमारतीच्या टेरेसवरून शेजारील घराच्या गच्चीवर उतरून दरवाजा किंवा खिडकी तोडून घरफोडी करत असे.
पोलीस पथकाची कामगिरी:
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सह पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त विनीता साहु, पोलीस उपआयुक्त अन्नपूर्णा सिंग आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीष काळसेकर, उपनिरीक्षक अमित बंडगर तसेच पोलीस कर्मचारी राजेश बरणे, राहुल गवई, विपिन रक्षे, धिरजकुमार भोपळे, प्रशांत खंडारे व रोशन बागडे यांनी केली.




