
मानोरा पोलिसांची मोठी कारवाई: आंतरजिल्हा शेळी-बोकड चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
वाशीम जिल्ह्यातील मानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या शेळी-बोकड चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत मानोरा पोलिसांनी आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीला अटक केली आहे. या कारवाईत चोरीच्या बकऱ्यांसह गुन्ह्यात वापरलेली महागडी अर्टिगा कार असा एकूण ७ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारवा आणि देऊरवाडी या गावांमधून बकऱ्या चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. पारवा येथील ज्ञानेश्वर सुखदेव राठोड यांची ४०,००० रुपयांची ३ बोकडं/बकऱ्या, तर देऊरवाडी येथील महादेव श्रावण शिंदे यांची २४,००० रुपयांची ३ बोकडं चोरीला गेली होती.

पारवा येथील घटनेच्या ठिकाणचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले असता, त्यात एक मारुती सुझुकी अर्टिगा कार संशयास्पदरित्या आढळून आली. मानोरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय बातमीदारांमार्फत शोध घेतला असता, ही गाडी ब्राह्मणगाव (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथील सतीश भारत श्रृंगारे याच्याकडे असल्याचे समजले.
आरोपींची नावे व अटक संशयिताला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यातील ब्राह्मणगाव येथील खालील ४ आरोपींना अटक केली आहे:

-
सतीश भारत श्रृंगारे (वय २९ वर्षे, रा. ब्राह्मणगाव)
-
करण विनोद राठोड (वय २३ वर्षे, रा. ब्राह्मणगाव)

-
प्रथमेश दिलीप पवार (वय २२ वर्षे, रा. ब्राह्मणगाव)
-
तुषार किशोर जाधव (वय १९ वर्षे, रा. ब्राह्मणगाव)

जप्त केलेला मुद्देमाल (एकूण ७,४९,००० रु.)
-
५ बकऱ्या/शेळ्या: (किंमत ४९,००० रुपये) – आरोपी प्रथमेश पवार याच्या घराची झाडाझडती घेतली असता ५ बकऱ्या मिळून आल्या. त्यापैकी ३ देऊरवाडीतील व २ पारवा येथील असल्याचे निष्पन्न झाले.
-
अर्टिगा चारचाकी गाडी: (क्रमांक MH-29-CJ-0938, किंमत अंदाजे ७,००,००० रुपये).
पोलीस प्रशासनाचे आवाहन सदर आरोपी हे अट्टल चोरटे असून त्यांनी इतर ठिकाणीही जनावरांची चोरी केली असण्याची शक्यता आहे. ज्या नागरिकांची जनावरे किंवा बकऱ्या चोरीला गेल्या असतील, त्यांनी मानोरा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
तपास पथक ही यशस्वी कारवाई वाशीम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे (पाटील), अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानोरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती नैना पोहेकर व त्यांच्या पथकातील पोउपनि दिनकर राठोड, पोउपनि रमेश पवार, पोहवा राधेश्याम महल्ले, शेषराव राठोड, पोकाँ रोहन तायडे, फिरोज शेख, अनिल दहातोंडे, पंकज खाडे आणि राम राठोड यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि दिनकर राठोड करत आहेत.




