
बोरवेलची वायर चोरणारे दोन विधीसंघर्ष बालक गंगाझरी पोलिसांच्या ताब्यात; १ लाख ७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
गोंदिया: शेतातील बोरवेलची वायर चोरणाऱ्या दोन विधीसंघर्ष बालकांना (नाबालिक आरोपी) गंगाझरी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीची वायर, कटर आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १,०७,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ३ जुलै २०२६ रोजी करण्यात आली. ही धडक कारवाई गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, आणि तिरोडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
रात्रीच्या सुमारास झाली होती चोरी डोंगरगाव येथील रहिवासी सुरेंद्र पूरणलाल टेंभरे यांनी गंगाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १ जुलै ते २ जुलै २०२६ च्या रात्री दरम्यान अज्ञात चोरांनी त्यांच्या शेतातील बोरवेलची सुमारे २५० फूट वायर (किंमत अंदाजे ७,५०० रुपये) कापून चोरून नेली होती. या तक्रारीवरून गंगाझरी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक ३०८/२०२६, कलम ३०३(२) BNS अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

गोपनीय माहितीवरून आरोपी गजाआड गुन्ह्याचा तपास करत असताना गंगाझरी पोलिसांच्या पथकाला ३ जुलै रोजी गोपनीय माहिती मिळाली. या चोरीत गोंदियातील संजयनगर भागात राहणाऱ्या दोन विधीसंघर्ष बालकांचा हात असल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून या दोन्ही बालकांना ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी वायर चोरी केल्याची कबुली दिली.
१ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त ताब्यात घेतलेल्या विधीसंघर्ष बालकांकडून पोलिसांनी गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात खालील वस्तूंचा समावेश आहे:

-
१) २५० फूट बोरवेलची वायर (किंमत ७,५०० रुपये)
-
२) वायर कापण्यासाठी वापरलेले दोन केबल कटर (किंमत २०० रुपये)

-
३) गुन्ह्यात वापरलेली होंडा ॲक्टिव्हा स्कूटर (किंमत १,००,००० रुपये)
-
एकूण जप्त मुद्देमाल: १,०७,७०० रुपये.

-
या पोलीस पथकाने केली कारवाई :- कारवाईत गंगाझरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) धीरज राजूरकर, पोलीस उपनिरीक्षक (PSI) धाराव, पोलीस हवादार भुरे, देशपांडे, तसेच पोलीस शिपाई राऊत, नागपुरे आणि जनेवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.




