
सेलू पोलिसांची धडक कारवाई; ११.७८ लाखांच्या मुद्देमालासह ६ जणांवर गुन्हा
दारू विकाल तर जेलमध्ये जाल! सेलू पोलिसांची मोठी कारवाई; ११ लाखांपेक्षा जास्त मुद्देमालासह ६ जणांवर गुन्हे दाखल
वर्धा (सेलू): ‘दारू विकाल तर जेलमध्ये जाल’ असा कडक इशारा देत वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलीस स्टेशनने अवैध दारू आणि हातभट्टी चालवणाऱ्यांवर मोठी धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून तब्बल ११,७८,६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, ६ आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. सदरची धडक कारवाई वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची धाड दिनांक ११ जुलै २०२६ रोजी सेलू पोलिसांना मुखबिराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की, पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गावठी मोहा दारूच्या हातभट्ट्या सुरू आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ११ जुलै रोजी सेलू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा बोरखेडी कला शेत शिवार, मौजा सोंडी शेत शिवार आणि मौजा कोटंबा शेत शिवार अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी अचानक धाडी टाकल्या.
११ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त या कारवाईदरम्यान पोलिसांनी दारूच्या अड्ड्यांवरून कच्चा मोहा सडवा रसायन, उकळता मोहा सडवा रसायन, तयार गावठी मोहा दारू, अमोनियम सल्फेट (AMMONIUM SULPHATE) पावडर आणि हातभट्टीसाठी लागणारे इतर साहित्य असा एकूण ११,७८,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

६ जणांवर गुन्हे दाखल, दोघांना अटक या बेकायदेशीर कृत्याप्रकरणी पोलिसांनी एकूण ६ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३ आणि दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंदवले आहेत. आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत: १) राजू तेजराम चरडे (वय ३७ वर्षे, रा. देवनगर, ता. सेलू) २) विकास उत्तम सडमाके (वय ३० वर्षे, रा. चांदापूर, ता. घाटांजी, जि. यवतमाळ, ह.मु. वार्ड क्र. ४ हिंगणी, ता. सेलू) ३) आनंद राय (रा. हिंगणी) ४) मनोज पिंपळे (रा. शिवणगाव) ५) प्रवीण आत्माराम थुल (रा. सुकळी स्टेशन) ६) सुनील नेहारे (रा. सोंडी)
या गुन्ह्यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सध्या सुरू आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली असून, सर्वसामान्य जनतेकडून सेलू पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

यांच्या मार्गदर्शनात झाली कारवाई
कारवाईमध्ये सेलू पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि. पंकज वाघोडे, पो.उपनि. शांताराम मुडमाळी, प्रवीण भोयर, तसेच पोलीस अंमलदार मनोहर मुडे, गणेश राऊत, श्रावण ठाकरे, अखिलेश गव्हाणे, ज्ञानदेव वनवे, गंगाधर तांबारे, ओम तल्लारी, मारोती किन्नाके आणि सूरज बोरजे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.





